शिक्षक भरतीसंदर्भात कौस्तुभ गावडेंचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
schedule09 Jan 25 person by visibility 59 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षक भरती तात्काळ सुरू करावी यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. शिक्षण मंत्रालयाच्यावतीने मुंबई येथे महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्था प्रतिनिधी व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गावडे यानी शिक्षक भरतीसंदर्भातील निवेदन दिले.
यामध्ये पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती तत्काळ सुरु करावी, आनंददायी शिक्षण देण्यासाठी कला शिक्षक व क्रीडा शिक्षकांची भरती करणे आवश्यक असल्याचे सांगून त्या भरतीलाही परवानगी द्यावी. शिक्षकेतर कर्मचारी ५० टक्के बढतीने व ५० टक्के सरळ सेवा भरती करावी असा निर्णय आहे, परंतु शिपाई पदे कमी केल्यामुळे शंभर टक्के कनिष्ठ लेखनिक भरणेस परवानगी मिळावी या मागण्या केल्या आहेत. तसेच सध्या सर्व शिक्षण विभागाच्या मान्यतेचा अधिकार मंत्रालयाकडे आहे त्याऐवजी मान्यता जिल्हास्तरावर व्हाव्यात असे सुचविले.
मंत्री भुसे यांनी शिक्षक भरती करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच पवित्र प्रणाली द्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा तातडीने सुरु करण्यात येईल. शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीही सुरु करू अशी ग्वाही दिली. त्यामुळे शिक्षण संस्थेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रसंगी कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य एस.एम.गवळी, संस्थेचे समन्वयक, शेखर कुलकर्णी उपस्थित होते.