कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे उडान
schedule04 Oct 22 person by visibility 1003 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअरच्यावतीने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर या आठवड्यातील तीन दिवस सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रारंभ मंगळवारी (ता.४ ऑक्टोबर) झाला. ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी असणार आहे
केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे फ्लॅग ऑफ दाखवून विमानसेवेचा प्रारंभ झाला. आला. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अपर सचिव उषा पहाडी, स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरनसिंग तिवाना आदी दूरदृष्यप्रणालीव्दारे तर कोल्हापूर विमानतळ येथे छोटेखानी झालेल्या समारंभासाठी छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडीक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे प्रमुख डॉ. संजय पाटील, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, स्टार एअरचे चेअरमन संजय घोडावत, संचालक श्रेणिक घोडावत आदी उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री सिंधीया म्हणाले,“ छत्रपती राजाराम महाराजांच्या दूरदृष्टीने तत्कालीन काळात कोल्हापूर विमानतळाची निर्मिती झाली. या विमानतळाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता आपण कटीबध्द असून येत्या मार्चपर्यंत नवीन अद्यावत डोमेस्टिक इमारतीची निर्मिती करण्यात येईल.” याप्रसंगी श्रीमंत शाहू महाराज यांनी या विमानतळावरुन केवळ कोल्हापूर-मुंबई परत कोल्हापूर अशी सेवा सुरु न राहता आंतरराष्ट्रीय विमान सेवाही सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, विमानतळाच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी शासनाकडून जे जे शक्य आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा कोल्हापूरच्या विकासाला गती मिळेल असे सांगितले. स्टार एअरचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी प्रास्ताविक केले. श्रेणिक घोडावत यांनी आभार मानले.