पशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा - डॉ. प्रमोद बाबर
schedule03 May 25 person by visibility 83 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत २०२५-२६ मध्ये विविध वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहे. या विविध लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२५-२६ या वर्षात राबविली जाणार आहे. तरी जिल्ह्यातील पशुपालकांना शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करावे तसेच टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 या क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी केले आहे.
पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सन २०२५-२०२६ मध्ये पुढील वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात येणार यामध्ये विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचा गट वाटप करणे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थ्यांना १ लक्ष ३४ हजार ४४३ रुपयाच्या मर्यादेत २ म्हैशी किंवा १ लक्ष १७ हजार ६३८ रुपयाच्या मर्यादेत २ संकरीत गायींचा गट वाटप करण्यात येणार आहे. विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १०+१ शेळी गट वाटप करणे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती,नवबौध्द प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७७ हजार ६५९ रुपयाच्या मर्यादेत १०+१ शेळी गट वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक योजना एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत १०० एकदिवशीय मिश्र कुक्कुट पक्षांचा गट वाटप करणे. या योजनेंतर्गत १०० एकदिवशीय मिश्र कुक्कुट पिलांचा गट व खाद्य अनुदानासाठी १४ हजार ७५० रुपये दोन टप्प्यांमध्ये देण्यात येते. या योजना सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आहे. जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचा गट वाटप करणे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना १ लक्ष ३४ हजार ४४३ रुपयांच्या मर्यादेत २ म्हैशी किंवा १ लक्ष १७ हजार ६३८ रुपयाच्या मर्यादेत २ संकरीत गायींचा गट वाटप होणार आहे.
जिल्हा आदिवासी घटक योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १०+१ शेळी गट वाटप करणे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७७ हजार ६५९ रुपयाच्या मर्यादेत १०+१ शेळी गट वाटप करण्यात येणार आहे.या सर्व योजनांमध्ये महिला लाभार्थीसाठी ३३ टक्के व अपंग लाभार्थ्यांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२५-२०२६ या वर्षात राबविली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ - https://ah.mahabms.com, अॅन्ड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव- AH-MAHABMS गुगल प्ले स्टोअर वर उपलव्ध असून अर्ज करण्याचा कालावधी ३ मे २०२५ ते २ जून २०२५ आहे. टोल फ्री क्रमांक १९६२ किवा १८००-२३३-०४१८ असा आहे.