प्राथमिक शिक्षण विभागात गतीमान कामाचा धडाका, वर्षभरात ५७० जणांना पदोन्नती !
schedule30 Aug 25 person by visibility 73 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात गतीमान कामाचा धडाका पाहावयास मिळत आहे. शिक्षकांशी निगडीत विविध प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले. तसेच विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक मिळून ५७० पदोन्नती दिल्या आहेत. यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची संख्या ४७, केंद्रप्रमुखांची संख्या ६८ तर मुख्याध्यापकांची संख्या ४५५ इतकी आहे. एकाच वर्षात विस्तार अधिकारी पदोन्नती आठ वेळा देणारा कोल्हापूर हा राज्यात एकमेव जिल्हा आहे. तसेच पदोन्नतीचे लाभ देऊन शंभर टक्के पदे भरणारा देखील कोल्हापूर जिल्हा एकमेव असावा.
समुपदेशन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे कोणावर अन्याय झाला, डावलले अशा तक्रारीही झाल्या नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी या साऱ्या विषयात लक्ष घालत पदोन्नतीमध्ये संबंधितांना न्याय मिळेल या पद्धतीने कामकाज केले. पदोन्नती दिल्यामुळे प्रशासनाने सेवाविषयक लाभ देण्याचे कर्तव्य पुर्ण केले आहे आता पदोन्नती धारकांनी किंबहुना शिक्षण विभागातील विविध घटकांनी गुणवत्तापूर्ण काम करून आपले कर्तव्य पार पाडावे अशी अपेक्षा शिक्ष विभागाने शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांकडे व्यक्त केली आहे.
विस्तार अधिकारी वर्ग 3 , केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक प्राथमिक असे पदोन्नतीचे संवर्ग आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चालू वर्षामध्ये केंद्रप्रमुखपद (कोर्ट प्रकरण ) वगळता शंभर टक्के पदोन्नतीची पदे भरली आहेत
यासाठी सामान्य प्रशासन विभागातील २०१९ मधील सरकारी निर्णयातील तरतुदी प्रमाणे निवड यादीला मंजुरी घेतली. जसजशी सेवानिवृत्तीमुळे अथवा अन्य कारणांमुळे रिक्त पदे होतील तसतसे पदोन्नतीचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
संपूर्ण प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अशी कामगिरी विभागाला करणे शक्य झाले आहे यामध्ये सामान्य प्रशासन विभाग व पदोन्नती समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लोककल्याणाकारी भावनेने प्रशासनात सकारात्मक निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे हे शक्य झाले असे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
………………..
शिक्षक संघटना खुश…अधिकाऱ्यांच्या अभिनंदनासाठी चढाओढ
मागील दहा वर्षात दहा वेळा पदोन्नती झाली नाही, मात्र यंदा एका वर्षात दहा वेळा पदोन्नती झाली असा शिक्षण विभागाचा दावा आहे. या पदोन्नती प्रक्रियेत तक्रारी उद्भवणार नाहीत याकडे शिक्षण विभागाने लक्ष दिले. यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शिक्षक संघटना तर जाम खुश दिसत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात अभिनंदनासाठी शिक्षक संघटनेमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे. विविध शिक्षक संघटनांचे सगळे पदाधिकारी एकापाठोपाठ एक जिल्हा परिषदेत दिसत आहेत. काही शिक्षक नेते तर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन सत्रात जिल्हा परिषदेच्या आवारात हजेरी लावत आहेत.