गोकुळच्या जाजम-घडयाळ खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती, पंधरा दिवसात अहवाल सादर होणार
schedule30 Aug 25 person by visibility 46 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कारभाराबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत सहकारी संस्था दुग्ध विभागाचे पुणे विभागीय उपनिबंधकांनी एक सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. सहकारी संस्था पदुम सांगली येथील जिल्हा विशेष लेखा (वर्ग दोन) परीक्षक सदाशिव गोसावी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. गोसावी यांना पंधरा दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
गोकुळच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त संलग्न दूध संस्थाना जाजम व घडयाळ वाटप करण्यात आले आहे. जवळपास सहा हजार दूध संस्था आहेत. या संस्थांना तीन कोटी ७४ लाख रुपये किंमतीची जाजम व घडयाळे वाटप केले आहे. मात्र ही सारी प्रक्रिया रितसर निविदा प्रक्रिया न राबविता झाली. केवळ कोटेशन मागवून जाजम व घडयाळे खरेदी केली आहेत. या साऱ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दुग्ध विभागाकडे केली होती. गोकुळ दूध संघाच्या १९ मार्च २०२५ च्य संचालक मंडळाच्या सभेत जाजम व घडयाळ खरेदीचा ठराव झाला होता.
दरम्यान विभागीय उपनिबंधक पाटील यांनी गोकुळकडे खुलासा मागविला होता. त्यावर गोकुळ दूध संघाने, पोटनियमानुसार कोटेशनद्वारे ही प्रक्रिया झाली. बाजारपेठेत चौकशी करुन निविदा मागविल्या होत्या. सर्वात कमी दर असणाऱ्या निविदाधारकांकडून जाजम व घडयाळे खरेदी केली. असा खुलासा केला होता. शिवसेनेचे उपनेते पवार यांनी जाजम व घडयाळ खरेदी नियमबाह्यरित्या झाली आहे. तसेच गोकुळच्या संचालकांच्या गोवा दौऱ्याचा खर्च याअनुषंगाने दुग्ध विभागाकडे चौकशीची मागणी केली होती. पवार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दुग्ध विभागाने एक सदस्यीय चौकशी समिती नेमली. तसेच त्यांना वस्तुनिष्ठ अहवाल पंधरा दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. दुसरीकडे गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या संचालकांचा गोवा दौरा स्वखर्चाने झाल्याचे म्हटले आहे.