सत्ताधाऱ्यांचे ऐकून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून थेट पाइपलाइन योजनेत अडथळे-काँग्रेसच्या नगरसेवकांचा आरोप
schedule30 Aug 25 person by visibility 122 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोल्हापूरकरांना पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते ही केवळ दुर्दैवीच नव्हे, तर लज्जास्पद बाब आहे. सत्ताधारी नेत्यांचे ऐकून महापालिकेचे अधिकारी थेट पाईपलाइन योजनेमध्ये अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केला. शहरातील पाणीपुरवठा तत्काळ सुरु करावा या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि शिल्पा दरेकर यांना दिले.
यावेळी, ‘अधिकाऱ्यांनी थेट पाईपलाईनमुळे शहरातील ६० ते ७० टक्के भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याची कबुली दिली. दरम्यान, काळम्मावाडी थेट पाईपलाईन येथे चार पंप असून त्यापैकी तीन पंप चालू असतात तर एक पंप स्टँडबाय साठी ठेवलेला आहे. सुरु असलेल्या तीन पंपापैकी एक पंप बंद झाला. तसेच स्टँडबाय पंप तब्बल तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत कबूल केले. त्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला. यावेळी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जोपर्यंत शहर जलअभियंता हर्षजीत घाटगे बैठकीला येत नाहीत, तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा घेतला. काही वेळाने घाटगे बैठकीत सहभागी झाल्यानंतर त्यांना धारेवर धरण्यात आले. सद्यस्थितीची माहिती देत रविवार, सोमवार पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे त्यांनी आश्वासन दिले.
काळम्मावाडी पाणी योजना ही आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने व दूरदृष्टीने शहराच्या पुढील ५० वर्षांसाठी पाण्याची गरज ओळखून केंद्र सरकारच्या मदतीने मंजूर करून आणली. योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे कोल्हापूर शहराला मुबलक, स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा करणे हा आहे. मात्र, महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. थेट पाईपलाइन योजनेत विनाकारण अडथळे निर्माण करून नागरिकांच्या हक्काचे पाणी रोखले जाते असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केला.
या बैठकीला माजी उपमहापौर भूपाल शेटे, मधुकर रामाणे, प्रतापसिंह जाधव, दुर्वास कदम, सुभाष बुचडे, राजाराम गायकवाड, मोहन सालपे, रियाज सुभेदार, जय पटकारे, दिग्विजय मगदूम, अभिजीत देठे, संजय पटकारे, संपत चव्हाण, अक्षय शेळके, उमेश पाडळकर, वैशाली महाडिक, उज्वला चौगले, शुभांगी साखरे, पूजा आरडे, संगीता घोरपडे उपस्थित होते.