शिये फाटा येथे गोळीबार, संभापूरचा तरुण पोलिसांच्या ताब्यात
schedule30 Aug 25 person by visibility 155 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिये फाटा येथील फेडरल बँकेसमोर शनिवारी (३० ऑगस्ट २०२५) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना घडली. गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी, संभापूर येथील गणेश अर्जुन शेलारला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून रिकामे काडतूस जप्त केले आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही घटना आर्थिक देवाणघेवाणीतून घडली की ‘अन्य’ काही कारणे आहेत यासंबंधीचा तपास पोलिस करत आहेत.
यासंबंधी पोलिस व घटनास्थळावरुन मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे, गणेश अर्जुन शेलार (संभापूर) व नितीन शिवाजी पाटील (नागाव ) विजय पोवार (रा. टोप) हे तिघेही मित्र आहेत. शेलार हा शनिवारी सायंकाळी शिये फाटा येथील फेडरल बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. पैसे काढत असताना विजय पोवार, नितिन पाटील यांच्यासह अन्य काही जण जण बँकेसमोरील रस्त्यावर उभे होते. शेलार पैसे काढून एटीएम सेंटरमधून बाहेर आला. यावेळी एटीएम बाहेत थांबलेल्या नितीन ,विजय व त्याच्या साथीदारांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शेलारने नितीन व विजय यांच्यावर पिस्तूल रोखून धरले.
दरम्यान जमावातील एकाने त्याचा हात हवेत उंचावला. हवेत तीनवेळा फायरिंग झाले. गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांची पळापळ झाली. घटनेनंतर गणेश हा शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान पोलिस ही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जमावाला पांगवले. रात्री आठ वाजता अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू व करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजीत कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी, शेलारकडून घटनेची माहिती घेतली. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गायकवाड घटनेचा तपास करत आहेत.