गणेशोत्सव कामासाठी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ! शिक्षकांनी टाकला कामावर बहिष्कार !!
schedule29 Aug 25 person by visibility 40 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव सुरळीतरित्या पार पडावा, घरगुती व सार्वजनिक गणेश विसर्जनाची प्रक्रिया सुलभरित्या झाली पाहिजे यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. गणेश विसर्जन प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी शहरातील खासगी प्राथमिक शाळा व महाापलिका शाळेतील मिळून १०० हून अधिक शिक्षकांवर कामाची जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान महपालिका प्रशासनाच्या या निर्णयाला सर्व खासगी-मनपा प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने विरोध केला आहे. तसेच या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नयेत हे कारण पुढे करत गणेशोत्सव काळात कोणतीही कामगिरी देऊ नये असे पत्रच शिक्षक संघटना कृती समितीने महापालिका प्रशासनाला दिले आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असे आदेश असतानाही महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत शिक्षकांवर कामे सोपविली आहेत, त्या कामावर शिक्षक बहिष्कार टाकत असल्याचे शिक्ष्क संघटना कृती समितीने म्हटले आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत. निवेदन शिक्षक संघटना कृती समितीचे महादेव डावरे, संतोष आयरे, दिलीप माने, राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, कृष्णात नाईक, संजय पोवाळकर, सुहास सुतार, प्रभाकर लोखंडे आदींच्या नावानिशी दिली आहे. दरम्यान शिक्षक संघटना कृती समितीची शुक्रवारी बैठक झाली. त्यामध्ये कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे म्हटले आहे.