कोल्हापुरातील डॉक्टर कुटुंबीयांची ४२ लाखाची आर्थिक फसवणूक
schedule29 Aug 25 person by visibility 76 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अतिरेक्यांशी तुमचे संबंध आहेत, तुम्हाला कोणत्याही क्षणी अटक होवू शकते अशी मोबाइलवर व्हिडिओ कॉलद्वारे भीती घालून कोल्हापुरातील डॉक्टर कुटुंबीयांची तब्बल ४२ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगत डिजीटल अरेस्टची भिती घालत ९ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही रक्कम ऑनलाइनरित्या लंपास केली. राजारामपुरी पहिल्या गल्लीतील डॉ. महेश्वर शितोळे व डॉ. दत्तात्रय शितोळे या बापलेकांची आर्थिक लूट झाली.त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शितोळे कुटुंबीय वैद्यकीय सेवेत आहे. वडील, आई, मुलगा असे सगळेजण डॉक्टर आहेत. अतिरेक्यांशी तुमचे संबंध आहेत, तुमच्या खात्यावरुन आर्थिक मदत झाली आहे अशी भिती घालण्यात आली. पोलिस अधिकारी बोलत आहे, तुम्हाला यातून सुखरुप बाहेर पडायचे असेल तर आम्ही सांगतो त्या अकाऊंटवर रककम जमा करा. तुमच्या बँकेतील खात्यांची खातरजमा करायची आहे. तुमची रक्कम सुरक्षित असेल असे व्हिडिओ कॉलवरुन सांगण्यात आले. त्यानुसार शितोळे कुटुबांने संबंधित सांगतील त्या खात्यावर पैसे जमा केली.
भामटयांनी, शितोळे कुटुंबीयांकडे शेअर्ससंबंधी विचारणा केली. डॉक्टरांनी चाळीस लाख रुपयांचे शेअर्स असल्याचे सांगितले. शिवाय शेअर्सची विक्री करुन चाळीस लाख रुपये आरटीजीएस केली. ४२ लाखाहून अधिक रक्कम उचलल्यानंतरही भामटयांनी आणखी तितक्याच रकमेचा भरणा करण्याविषयी सांगितले. तेव्हा डॉक्टरांनी, त्यांच्या मित्रांना यासंबंधी कल्पना दिली. मित्रांनी, तुमची आर्थिफ फसवणूक सुरू असल्याचे सांगितल्यावर डॉक्टरांनी पोलिस ठाणे गाठले. आणि फसवणुकीचा प्रकार समोर आला.