पालकमंत्री आबिटकर, आमदार महाडिकांनी केली क्रीडा संकुलाची पाहणी
schedule22 Jun 25 person by visibility 38 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. रविवारी दुपारी पालकमंत्री आबिटकर, आमदार अमल महाडिक यांनी क्रीडा संकुलाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलाच्या विकासासाठी नामवंत सल्लागारांची नेमणूक करून प्रस्तावित आराखडा बनवून तो सरकारकडे सादर करण्याची सूचना केली.
पालकमंत्र्यांनी क्रीडा संकुलात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स, रायफल शूटींग, इनडोअर गेम्स आणि जिम यासारख्या सुविधा कोल्हापूरकरांना उपलब्ध करून देण्यासाठी सविस्तर नियोजन करण्याची सूचना केली. कोल्हापूरातील खेळाडूंना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. क्रीडा संकुलात सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यात कोणतीही तडजोड न करता उच्च दर्जा राखा. वेळेत कामे पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. यामुळे खेळाडूंना लवकरात लवकर या सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच, क्रीडा संकुलाचा वापर वाढवण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, क्रीडा विभागाचे उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस उपस्थित होते.