पप्पा सांगा कुणाचे… पप्पा साऱ्या कलारसिकांचे ! अरुण सरनाईक म्हणजे मराठी सिनेमाचे सिंहासन!!
schedule22 Jun 25 person by visibility 427 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिनेमाचा पडदा असो की नाटकाचा रंगमंच, प्रत्येक ठिकाणी आपल्या कसदार अभिनयांनी व्यक्तिरेखा अजरामर करणाऱ्या…अभिनयासोबच ढोलक, तबला, हार्मोनियमय वादनात वेगळी ओळख निर्माण केलेल्या….वडिलांचा गायकीचा वारसा जोपासताना जीवनाचा प्रवास सुरेल बनविणारा आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे अरुण सरनाईक...! या उमद्या कलावंतांच्या कला आणि जीवनाचा देखणा प्रवास रविवारी उलगडला…कुटुंबात ‘पप्पा‘ या नावांनी परिचित. स्वकर्तृत्वावर कलाक्षेत्रात वेगळी उंची गाठलेल्या हे चंदेरी दुनियेतील व्यक्तिमत्व केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता…‘पप्पा अर्थात अरुण सरनाईक हे साऱ्या कलारसिकांचे…!!’ याची अनुभूती देऊन गेला. ८० मिनिटाचा हा माहितीपट संपताच प्रत्येकाच्या ओठी आणि मनी अरुण सरनाईक म्हणजे मराठी सिनेमाचे सिंहासन अशी भावना उमटत राहिली.
निमित्त होतं, दिवंगत अभिनेते. अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित ‘पप्पा सांगा कुणाचे…’या माहितीपटाच्या प्रदर्शनाचे. सरनाईक यांच्या कन्या डॉ. सविता सरनाईक-नाईकनवरे यांनी या माहितीपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक संतोष पाठारे यांनी तो दिग्दर्शित केला आहे. या माहितीपटाचा प्रिमीयर शो, २२ जून २०२५ रोजी गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे सभागृहात झाला. या शोसाठी कलारसिकांनी प्रचंड गर्दी करत अरुण सरनाईक यांच्यावरील प्रेमाची प्रचिती घडविली. तब्बल ४१ वर्षापूर्वी मोटार अपघातात मरण पावलेल्या अरुण सरनाईक यांच्या आठवणी जागविताना प्रत्येकजण हळवा बनला. कोण त्यांच्यासोबत सिनेमा, नाटकात काम केलेलं….कोण त्यांना सिनेमा आणि रंगमंचावर कलाकार म्हणून पाहिलेलं…तर कुणाचे मित्रत्वाचे संबंध…
खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, दिग्दर्शक संतोष पाठारे, निर्मात्या डॉ. सविता नाईकनवरे, बांधकाम व्यावसायिक रणजीत नाईकनवरे यांच्या हस्ते माहितीपट लाँन्च केला. उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम संपताच ११ वाजून ४० मिनिटाच्या आसपास माहितीपटाच्या प्रदर्शनास सुरुवात झाली. कन्या डॉ. सविता सरनाईक हे फोटो अल्बममधून अरुण सरनाईक यांच्या आठवणींचा पट उलगडू लागला…आणि पहिल्या मिनिटापासून प्रेक्षक त्यामध्ये गुंतला. डॉ. सविता सरनाईक यांनी वडिलांसोबतचे किस्से, कुटुंबांतील गमंतीजमंती, आईच्या आठवणी या साऱ्या गोष्टी उलगडल्यामुळे त्याला भावनिक किनार लाभलीय.
अरुण सरनाईक यांना वडिलांकडून गायनाचा वारसा लाभला. शंकरराव सरनाईक हे महाराष्ट्र कोकिळ म्हणून सर्वपरिचित. ते, शास्त्रीय गायक. मिरजेतील खाँसाहेब यांच्याकडे त्यांनी गायकी शिकलेली. आपसूकच मिरजमधील खाँसाहेबांच्या कलेला वंदन करत हा प्रवास सुरू होतो. हळूहळू स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या कला आणि जीवनाचा प्रवास उलगडत जातो. कोल्हापूर तर त्यांची जन्म आणि कर्मभूमी. मंगळवार पेठेतील तस्ते गल्लीत वास्तव्य. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, रंकाळा तलाव, संगीतसूर्य केशवराव भोसले नाटयगृह, शिवाजी विद्यापीठ, शांताकिरण स्टुडिओ…अशा असंख्य ठिकाणांना जोडत हा प्रवास पुढे सरकतो.
७० च्या दशकात रंगभूमी आणि सिनेसृष्टीला एक देखणा चेहरा मिळाला तो, अरूण सरनाईक यांच्या रूपाने.. व्यावसायिक रंगभूमीवरून अभिनय क्षेत्रात आलेल्या अरूण सरनाईक यांनी शाहीर परशूराम या चित्रपटातून मोठया पडद्यावर पदार्पण केले. मुंबईचा जावई, एक गाव बारा भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, सिंहासन हे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले. त्यांची, ‘तुघलक, अपराध मीच केला, अशी पाखरे येती, गुड बाय डॉक्टर…’अशी कितीतरी व्यावसायिक नाटकं गाजली. तबला, ढोलकी, पेटी, तंबोर्याची साथ अशा वाद्यांमध्ये निष्णात होते. गाणं उपजत अंगात असल्यामुळे कोणतही गाणं किंवा अभंग त्यांना सहजपणे गाता यायचे... अशा असंख्य आठवणी त्यांच्या सोबत काम केलेल्या गायक, कलाकार, दिग्दर्शकांच्या माध्यमातून रसिक मनाचा ठाव घेतात.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेते मोहन आगाशे, दिलीप बापट, अभिनेत्री लीला गांधी, प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेता-लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर, डॉ. दिग्विजय वैद्य, रत्नमाला धीरज चव्हाण यांचे अनुभव ऐकताना अरुण सरनाईक यांचे व्यक्तिमत्व किती विविधांगी होते हे दिसत जाते. ‘ नाटकात काम करताना त्यांचा अभिनय हा अभिनय नसून त्यात जिवंतपणा वाटायचा. सिनेमातील अरुण सरनाईक वेगळे आणि नाटकातील अरुण सरनाईक वेगळे…इतकी वैविध्यता त्यांच्या भूमिकेत असायची.’असे रंगकर्मी दिलीप बापट यांनी सांगितले. तर वास्तवाशी अधिकाधिक जवळ जाण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा अशा शब्दांत अभिराम भडकमकर यांनी अरुण सरनाईक यांचे वेगळेपण अधोरेखित केले. तर उपस्थित प्रेक्षकांनी ‘तुज सम तूच…!’ म्हणत अरुण सरनाईक यांना सलाम केला.