बिद्रीसाठी चिन्ह वाटप, सत्ताधारी पॅनेलला विमान ! विरोधी आघाडीला कपबशी !!
schedule20 Nov 23 person by visibility 411 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी चिन्ह वाटप झाले. सत्ताधारी आघाडीला विमान तर विरोधी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळाले आहे. कारखान्याची निवडणूक तीन डिसेंबरला होणार असून मतमोजणी पाच डिसेंबरला होणार आहे.
दूधगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत दुरंगी लढत होत आहे. सोमवारी चिन्ह वाटप करण्यात आलं. यामध्ये सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीला विमान, तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीला कपबशी हे चिन्ह दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली.
सत्ताधारी गटाच्या नऊ उमेदवारांनी माघारीनंतर कपबशी हे चिन्ह मिळण्यासाठी सर्वप्रथम कार्यालयात अर्ज दिला होता. यावर विरोधी आघाडीनं सत्ताधारी पॅनलवर आक्षेप घेत २५ उमेदवार असलेल्या पॅनेलला कपबशी हे चिन्ह मिळावे अशी मागणी केली. सोमवारी चिन्ह वाटपासाठी निवडणूक अधिकारी काकडे यांच्यासमोर सत्ताधारी गटातर्फे कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी स्वतः बाजू मांडली. नियमानुसार सर्वप्रथम आमच्या नऊ उमेदवारांनी मागणी केल्याने सत्ताधारी आघाडीला कपबशी हे चिन्ह मिळावे अशी भूमिका मांडली. तर विरोधी पॅनलच्यावतीने त्यांच्या वकिलांनी भूमिका मांडली. विरोधी पॅनलच्या सर्व २५ उमेदवारानी कपबशी निवडणूक चिन्हाची मागणी केल्याचं सांगितलं. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी काकडे यांनी सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीस विमान, तर विरोधी राजर्षी शाहू आघाडीस कपबशी चिन्ह दिल्याचं जाहीर केलं.
या निवडणूकीसाठी ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अपक्षांमध्ये रामचंद्र दत्तात्रय पाटील (टेबल), अजित बाबुराव पोवार (शिट्टी), बाळासाहेब मल्हारी पाटील (शिट्टी), रेखा महेशकुमार पाटील (रिक्षा), चंद्रकांत विष्णू जाधव-परीट (छत्री), दत्तात्रय पांडूरंग गिरी (किटली) यांनाही चिन्हाचे वाटप करण्यात आले.