अजितदादा, तुम्ही शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी, तुम्हाला सीएसएमयूचा विद्यार्थी म्हणून घ्यायला आवडेल का ?
schedule27 Mar 25 person by visibility 999 categoryशैक्षणिक

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नको ! शिवप्रेमींनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट !!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य आहे. विद्यापीठाचा नामविस्तार करू नये. नामविस्तार झाल्यास शिवाजी या नावाचा उल्लेख होणार नाही. परिणामी विद्यापीठाची मूळ ओळख संपुष्टात येईल.’ अशी स्पष्ट भूमिका शिवप्रेमी व शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली. उपमुख्यमंत्री पवार हे गुरुवारी (२७ मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर होते. शिष्टमंडळाने, सर्किट हाऊस येथे पवार यांची भेट घेऊन नामविस्तार नको या मागणीचे निवेदनही दिले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, डॉ. डी. यू. पवार, प्राचार्य डी. आर. मोरे, विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष भैय्या माने, सिनेट सदस्य डॉ. प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेऊन शिवाजी विद्यापीठाची स्थापना, विद्यापीठाची नावनिश्चिती, त्यामागील व्यापक उद्देश याविषयी सांगितले. छत्रपती राजाराम महाराज, प्राचार्य बाळकृष्ण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विद्यापीठ स्थापण्यामागील उदात्त विचारही शिष्टमंडळातील निदर्शनास आणला. इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये असे सांगितले. प्राचार्य डी. आर. मोरे यांनी विद्यापीठ स्थापन करतानाच सर्वंकष विचार करुन नाव निश्चिती झाली आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा शॉर्टफॉर्म होऊ शकतो.असे निदर्शनास आणले.
डॉ. डी. यू. पवार उपमुख्यमंत्री पवार यांना म्हणाले, ‘तुम्ही, शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहात. शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून घ्यायला आवडेल की सीएसएमयूचे विद्यार्थी असे म्हणून घ्यायला आवडेल ? विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये.’उपमुख्यमंत्री पवार यांनी यासंबंधी सिनेटचे मत काय ? अशी विचारणा केली. त्यावर भैय्या माने यांनी ‘विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाने व सिनेटने विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये. शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य आहे.’असा एकमुखी निर्णय घेतला आहे. सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी ’जनतेची व शिवप्रेमीची ईच्छा सुद्धा शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे अशी आहे.’असे सांगितले. यावर पवार यांनी शिष्टमंडळाला,तुमच्या साऱ्यांच्या भावनांचा आदर आहे अशा शब्दांत आश्वस्त केले.
शिष्टमंडळात व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, प्रा. रघुनाथ ढमकले, अमरसिंह रजपूत, सिनेट सदस्य अॅड. अजित पाटील, विष्णू खाडे, स्वागत परुळेकर, माजी सिनेट सदस्य संजय जाधव, विनोद पंडित, डॉ. मंजुश्री पवार आदी उपस्थित होते. सिनेट सदस्य, आमचं विद्यापीठ - शिवाजी विद्यापीठ असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट परिधान केले होते.