जिप कर्मचाऱ्यांच्या स्थानांतर बदल्या रखडल्या, माहिती संकलित पण निर्णय नाही !
schedule11 Dec 24 person by visibility 157 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या स्थानांतर बदल्या करण्याचे ठरले होते. मात्र दोन आठवडयाचा कालावधी उलटूनही अद्याप कोणत्याच हालचाली दिसत नाहीत. लिपिक, विस्तार अधिकारीसह अन्य कर्मचाऱ्यांच्या स्थानांतर बदल्या दरवर्षी होत असतात. कर्मचारी संघटनांनी मागणी करुनही प्रशासकीय पातळीवर यासंबंधी निर्णय झाला नाही.
एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा बजाविलेल्या कर्मचाऱ्यांच्या स्थानांतर बदल्याची चर्चा सध्या मुख्यालयात सुरू आहे. काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत. महत्वाच्या ठिकाणची जागा त्यांना सोडवत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे नियमानुसार बदल्या हव्यात असा सूर अनेक कर्मचाऱ्यांचा आहे. नोव्हेंबर महिन्यात कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्यासोबत बैठक झाली होती. या बैठकीत स्थानांतर बदल्यासंबंधी चर्चा झाली.
आचारसंहिता संपल्यानंतर स्थानांतर बदल्या करण्याचे ठरले. विधानसभेची निवडणूक होऊन दोन आठवडयाचा कालावधी उलटला. अद्याप त्यासंबंधी हालचाली दिसत नाहीत. यामुळे बदलीच्या प्रतिक्षेतील कर्मचाऱ्यामध्ये चुळबूळ सुरू झाली आहे. तर जे महत्वाच्या पदावर आहेत, त्यांना टेबल सोडवत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान कर्मचाऱ्यांच्या स्थानांतर बदल्यासंबंधी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई म्हणाल्या, ‘स्थानांतर बदल्यासंबंधीची मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्यासोबत कर्मचारी संघटनेची बैठक झाली. त्या अनुषंगाने प्रशासनाने माहिती संकलित केली आहे. मात्र या बदल्यासंबंधी अद्याप निर्णय झाला नाही. ’