देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, तंत्रज्ञान विकास केंद्रे म्हणून कार्य करावे- डॉ. सतीश
schedule24 Dec 25 person by visibility 12 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य केले पाहिजे. यासाठी उच्च शिक्षणाचा विस्तार आणि संशोधन उत्पादनात वाढ गरजेची आहे. शिवाय जागतिक ज्ञाननेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी भारताने आपल्या वेगाने वाढणाऱ्या उच्च शिक्षण व्यवस्थेचा आणि संशोधन क्षमतेचा प्रभावी उपयोग करणे आवश्यक आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या संस्था प्रथमच विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान, संशोधन निष्पत्ती आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावू शकतात’असे मत प्रख्यात संशोधक डॉ. जी सतीश रेड्डी यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी, २५ डिसेंबर २०२५ रोजी दिमाखात पार पडला. या समारंभात विद्यार्थी अक्षय अरुण नलवडे यांना राष्ट्पती सुवर्णपदक तर आर्या संजय देसाई यांना कुलपती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. यंदाच्या दीक्षांत समारंभात प्रत्यक्ष व टपालाद्वारे ४९,९०२ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. याप्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. रेड्डी यांनी, ‘भारतात एक हजारांहून अधिक विद्यापीठे असून सुमारे ४.३८ कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत आहेत. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनांमुळे क्षेपणास्त्रे, रडार, सोनार, टॉर्पेडो, एअरबॉर्न वॉर्निंग सिस्टीम्स, विमाने, पाणबुड्या, जहाजे, चिलखती वाहने, रणगाडे आणि तोफा अशा विविध क्षेत्रांत स्वदेशी क्षमता विकसित झाली आहे. पुण्यात टाटा आणि भारत फोर्ज यांनी डीआरडीओच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेली स्वदेशी तोफ—जिचा वापर लाल किल्ल्यावर औपचारिक समारंभात होतो—जागतिक स्तरावर उत्कृष्ट मानली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ही बाब या परिवर्तनाचे प्रतीक आहे. उद्योगक्षेत्राने, विशेषतः खासगी कंपन्यांनी, संरक्षण संशोधन व उत्पादनात सक्रिय सहभाग घेऊन वाढत्या संधींचा लाभ घ्यावा.’असे आवाहन रेड्डी यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी, शिवाजी विद्यापीठाची गौरवशाली परंपरा, दर्जेदार व समताधिष्ठित शिक्षण देण्यातील त्याची भूमिका, तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी व जबाबदार नागरिक म्हणून अपेक्षित असलेली भूमिका यांचा सविस्तर ऊहापोह करण्यात आला. सातत्यपूर्ण अध्ययन, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, नैतिक मूल्यांची जोपासना आणि समाज व राष्ट्रासाठी—राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावर—योगदान देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकीचे केंद्र म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख आहे. शिवाजी विद्यापीठ हे केवळ शैक्षणिक संस्था नसून स्वाभिमान, सामाजिक जबाबदारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर उभे असलेले प्रेरणास्थान असल्याचे’त्यांनी सांगितले. प्रकुलगुरु डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. कुलसचिव व्ही. एन. शिंदे, परीक्षा विभागाचे संचालक अजितसिंह जाधव, अधिष्ठाता, सिनेट सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला.