गोकुळच्या दिनदर्शिकेतून उलगडतोय दुग्ध व्यवसाय,अद्ययावत माहिती दूध उत्पादकांसाठी उपयुक्त
schedule24 Dec 25 person by visibility 46 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ दूध उत्पादकांना डोळयासमोर ठेवून विविध योजना राबवित असते. संघातर्फे प्रकाशित २०२६ या वार्षिक दिनदर्शिकेतून दुग्ध व्यवसायाची माहिती उत्पादकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. दुग्ध व्यवसायची निगडीत माहिती दिनदर्शिकेत दिली आहे. ही अद्ययावत माहिती दूध उत्पादकासाठी उपयुक्त ठरत आहे. दिनदर्शिका जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार प्राथमिक दूध संस्थांना वितरित केली जाते.
चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते २०२६ या नवीन वर्षीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकते. गोकुळ प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे हा कार्यक्रम झाला. यावर्षीची दिनदर्शिका दुग्ध व्यवसायावर आधारित आहे. त्यामध्ये अद्ययावत दूध संकलन पद्धती, जातिवंत म्हैस विक्री केंद्र, मुक्त गोटा संकल्पना, रेड्या संगोपन केंद्र, मायक्रो ट्रेनिंग सेंटर, लसीकरण, गोकुळ हर्बल पशुपूरक उत्पादने, गोकुळ सुधन सेंद्रिय खते, वंधत्व निवारण शिबिरे, महालक्ष्मी मिनरल मिक्सचर, महालक्ष्मी प्रेग्नन्सी रेशन तसेच आयव्हीएफ संकल्पना यासंदर्भातील तांत्रिक व शास्त्रशुद्ध माहिती आहे.
चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात, कमी खर्चात किफायतशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पानावर क्यूआर कोड देण्यात आहे. त्याद्वारे संबंधित क्यूआर कोड स्कॅन केल्यास त्या पानावरील विषयाची सविस्तर, अद्ययावत व उपयुक्त माहिती थेट दूध उत्पादकांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती अधिक सुलभ व प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा अभिनव उपक्रम आहे.
या दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे छायाचित्र, गोकुळ प्रधान कार्यालयाची इमारत तसेच करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथील ज्योतिर्लिंग दूध संस्थेचे दूध उत्पादक अनिता व बाळू शेळके यांचे छायाचित्र आहे. म्हैस अकराव्या वेताची असून, तिच्याकडून प्रतिदिन सरासरी २० लिटर दूध उत्पादन घेतले जात आहे. यासोबतच गोकुळच्या विविध दुग्धजन्य उत्पादनांचे आकर्षक छायाचित्रेही आहेत. कार्यक्रमात संघाचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंके यांनी दिनदर्शिकेत समाविष्ट असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील उपस्थित होते.