महाविकास आघाडी की स्वतंत्र ? शिवसेना ठाकरे पक्षाचा बुधवारी निर्णय, अरुण दुधवडकर करणार सतेज पाटलांशी चर्चा
schedule23 Dec 25 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत राहून एकत्रित लढायचे की स्वतंत्रपणे सामोरे जायचे याचा निर्णय शिवसेना ठाकरे पक्षातर्फे बुधवारी, २४ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी, सायंकाळी हॉटेल अयोध्या येथे बैठक झाली. काँग्रेसकडून सन्मानजनक जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीसोबत राहायचे आणि सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर स्वतंत्रपणे लढायचे का यासंबंधी चर्चा झाली. यासंबंधीचा अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. त्यांना मंगळवारी बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. दरम्यान जागा वाटपासंबंधी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे बुधवारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.
मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व इच्छुक उमेदवारांची मते व भूमिका दुधवडकर यांनी जाणून घेतली. या बैठकीस उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे, महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे, युवा अधिकारी मंजीत माने तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. संपर्कप्रमुख दुधवडकर यांनी इच्छुक उमेदवारांशी स्वतंत्रपणेही चर्चा केली. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत युतीबाबत अंतिम चर्चा बुधवारी करण्यात येणार आहे. पक्षाला सन्मानजनक जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीसोबत युती करण्यात येईल. अन्यथा, बैठकीतील सर्व अहवाल पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात येऊन त्यांच्या अंतिम आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले.
………………..
दहा जागाबाबत तोडगा निघण्याची शक्यता
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने काँग्रेसकडे ३३ जागांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र काँग्रेस समितीने, इलेक्टिव्ह मेरीटला प्राधान्य देत ज्यांच्याकडे जिंकण्याची क्षमता त्याला उमेदवारी हे सूत्र ठरल्याचे सांगितले. तसेच इतक्या जागा देता येणार नाहीत असे कळविल्याचे वृत्त आहे. काँग्रेस समिती व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये यापूर्वी बैठका झाल्या. पण सन्मानजनक तोडगा निघाला नाही. काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला जास्तीत जास्त सात ते आठ जागा देण्याचा विचार आहे. मात्र शिवसेनेला जादा जागा हव्या आहेत. दोन्ही पक्षात चर्चेच्या माध्यमातून दहा जागावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.