अमूलच्या विरोधात राज्यातील दूध संघानी एकत्र येण्याची गरज !
schedule29 May 23 person by visibility 300 categoryउद्योग

गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळेंची दुग्धविकासमंत्र्यांच्या सोबत चर्चा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "अमूलचे आव्हान परतावून लावण्यासाठी राज्यातील सर्व दूध संघानी एकत्र येण्याची गरज आहे. कर्नाटक व तामिळनाडू सरकारने अमूलच्या विरोधात जशी भूमिका घेतली त्याच प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घ्यावी. यासाठी महानंदाने पुढाकार घ्यावा आणि राज्य सरकारने त्याला खंबीर साथ द्यावी."या विषयावर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) चेअरमन अरुण डोंगळे यांनी राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत चर्चा केली.
गोकुळचे नूतन चेअरमन डोंगळे यांनी राज्याचे दुग्धविकासमंत्री विखे -पाटील यांची भेट घेतली. या भेटीत दुग्ध व्यवसायासंबंधी चर्चा झाली. दुधाचे उत्पादन वाढ, दुधाची गुणवत्ता यापासून ते मार्केटिंगपर्यंत अशा वेगवेगळ्या विषयावर मंत्र्यांच्यासोबत चेअरमन डोंगळे यांनी चर्चा केली. अहमदनगर येथे ही भेट झाली. याप्रसंगी चेअरमन डोंगळे यांनी मंत्री विखे पाटील यांना पुष्पगुच्छ देत गोकुळ परिवारातर्फे सत्कार केला. याप्रसंगी डोंगळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मंत्री विखे - पाटील यांनी, " या विषयासंबंधी महानंदांचे चेअरमन यांच्यासोबत चर्चा करू. लवकरच संयुक्त बैठकीचे आयोजन करून." अशी ग्वाही दिली. याप्रसंगी पी.टी. शिंदे, अजित पाचुंदकर आदी उपस्थित होते.