वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस ऑगस्टपासून कोल्हापुरात धावणार, स्वातंत्र्यदिनी चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ
schedule10 May 25 person by visibility 158 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या बुध्दगार्डनमध्ये ई बसेसचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी तयारी सुरु आहे. खासदार महाडिक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्यासोबत या कामाचा आढावा. येत्या ५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन दिली. १५ ऑगस्टला ई बस चार्जिंग स्टेशनचा शुभारंभ होणार असल्याचे खासदार महाडिक यांनी जाहीर केले. यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ई बसेस कोल्हापुरातील रस्त्यावरुन धावण्याची चिन्हे दिसत आहेत.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रकल्प विभाग प्रमुख पी.एन. गुरव, कंत्राटदार निलेश पाटील, कन्सल्टंट प्रशांत हडकर, राष्ट्रीय महामार्गाचे साईट इंजिनिअर सोहम भंडारे, एमएसईबीचे एझियुटिव्ह इंजिनिअर शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक झाली. खासदार महाडिक यांनी प्रकल्प स्थळावरील कामाची पाहणी केली. बुद्ध गार्डन मधील अकरा एकर जागेपैकी साडेपाच एकर जागा या प्रकल्पासाठी घेतली आहे. या ठिकाणी अद्ययावत इलेट्रिक बस स्टेशन आणि चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार आहे. कंपाउंड वॉल, चार्जिंग स्टेशन, इलेट्रिक रूम, बस चालकांना राहण्याची, कॅन्टीनची सुविधा, फ्लोरिंग काम, कॉलम, इलेट्रिक रुम, महावितरण आणि हायवे अॅथॉरिटी यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.
महाडिक म्हणाले, ’शंभर ई बसेस तयार आहेत. मात्र चार्जिंग स्टेशनच्या कामाची पूर्तता झाली नसल्याने बसेस मागवल्या नाहीत. कोणत्याही परिस्थितीत हे काम गतीने पूर्ण झाले पाहिजे. १५ ऑगस्टला या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे.’ या बैठकीदरम्यान माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, राजसिंह शेळके, संग्राम निकम, रविकिरण गवळी, जयराज निंबाळकर, मंगला निपाणीकर, मोहसीन बागवान, फिरोज बागवान उपस्थित होते.