कोल्हापूर उद्यम सोसायटीच्या अध्यक्षपदी जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार
schedule11 May 25 person by visibility 43 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी सुधाकर बापूसो सुतार यांची बिनविरोध निवड झाली. उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या २०२५-२०३० या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार, शिवसेना उपनेत्या जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखालील 'राजर्षी शाहू जुने सत्तारूढ पॅनेल'ने पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करत १३ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या.
सोसायटीच्या संचालक मंडळाची शनिवारी (१० मे २०२५) बैठक झाली. यामध्ये अध्यक्षपदी माजी आमदार जाधव तर उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे संचालक माजी उपाध्यक्ष राजन सातपुते, संजय अंगडी, हिंदुराव कामते, चंद्रकांत चोरगे, अशोक जाधव, संजय थोरवत, आनंद पेंडसे, अतुल आरवाडे, अविनाश कांबळे, अमर कारंडे, संगीता नलवडे आदी उपस्थित होते. ए. पी. खामकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
माजी आमदार जाधव म्हणाल्या, सभासद, फौंड्री उद्योजकांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांचे काम यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे संस्थेचे काम अधिक चांगले करण्याची जबाबदारी माझी असून, सर्व संचालकांना विश्वासात घेऊन ही जबाबदारी मी पूर्ण करेन. संस्थेच्या संभापूर औद्योगिक वसाहतमधील विजेचा प्रश्न मी सोडवला आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणी आणि शहरात आयटी पार्क डेव्हलपमेंट साठी मी कटिबद्ध आहे.