गावागावात ग्रंथालये आहेत, आता घराघरात ग्रंथालय व्हावं - लेखक कृष्णात खोत
schedule06 Feb 25 person by visibility 135 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुस्तके काम करतात. पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कृष्णात खोत यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. सुशांत मगदूम, ग्रंथालय संघ कार्यवाहक भीमराव पाटील, आपटे वाचन मंदिराचे अध्यक्षा सुषमा दातार, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
कृष्णात खोत म्हणाले, लेखक व त्यांचे लेखन खऱ्या अर्थाने आपली, आपल्या समाजाची संपत्ती आहे. समाजाने हिटलरकडे न जाता गौतम बुद्धांकडे जावे. साहित्य हे शांततेचा आवाज मोठा करते. साहित्य, वाचन आणि ग्रंथसंपदेमुळे त्यांचा शेक्सपिअर जगाला कळला, परंतु आपल्या घरात असणारा तुकाराम मात्र अजून कित्येकांना माहित नाही. प्रत्येकाची भाषा, प्रत्येक समाजाची भाषा टिकली पाहिजे. जगातील वेगवेगळे साहित्य आपल्या भाषेत आले पाहिजे तर आपले साहित्य जगाच्या भाषेत भाषांतरित केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी या ग्रंथोत्सवामध्ये दोन दिवस चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे सांगून या ग्रंथोत्सवासाठी विद्यार्थ्यांचाही सहभाग वाढवावा असे सांगितले. विद्यार्थ्यांनी तसेच युवा पिढीने ग्रंथ साहित्याकडे वळणे आवश्यक असून डिजिटल युगात इंटरनेटचा संदर्भ घेण्याचे कमी करून विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने पुस्तकांचे संदर्भ मोठ्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. यासाठी त्यांच्यात वाचन संस्कृती वाढवणे आता गरजेचे झाले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सकाळी ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडी झाली . यावेळी इचलकरंजी शहरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व ग्रामस्थ यांनी सहभाग नोंदवला.