समिधा प्रतिष्ठानतर्फे महिला दिन-पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात
schedule11 Mar 25 person by visibility 29 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथी दिवशी समिधा प्रतिष्ठानच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण आणि पुरस्कार वितरणसमारंभ उत्साहात पार पडला. ब्रह्मेश्वर बागेतील सुमन हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योजिका आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या दीपा देशपांडे या उपस्थित होत्या.
समिधा प्रतिष्ठानच्या वतीने गेली चौदा वर्षे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या साठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येते आहे. यावर्षी महिलांसाठी मोफत रक्त व आरोग्य तपासणी शिबिर, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मराठी भावगीतांची कराओके गायन स्पर्धा आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र किंवा महाकुंभ 2025 यापैकी एका विषयावर रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले होते. महिलांनी मोठ्या प्रमाणात या यात सहभाग घेतला.
भारतमाता आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीप प्रज्वलनाले कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित ठाणेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या स्थापनेपासूनच्या कार्याची माहिती उपस्थिताना दिली. स्पर्धांविषयी बोलताना, "महिलांना रोजच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा आणि त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धांचे आयोजन करतो. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपणही समाजाच्या हितोपयोगी कार्याची समिधा अर्पण करणार्या व्यक्ती व संस्थांना समिधा पुरस्कार देण्यात येतो. त्यानंतर महानगरपालिकेच्या फिरंगाई आरोग्य केंद्रातील सर्व आशा सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात समिधा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राधिका ठाणेकर यांनी स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम केलेल्या नम्रता कामत,शिरीष कुलकर्णी, प्रख्यात चित्रकार नागेश हंकारे आणि अनंत यादव यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
दिपा देशपांडे यांनी अतिशय कौशल्याने उपस्थित महिलांशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व, त्यातून निर्माण झालेल्या संघटना व त्याचा महिलांच्या सामाजिक तसेच व्यावसायिक जीवनावर झालेला परिणाम थोडक्यात विषद केला. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे उद्दिष्ट असते आणि यावर्षीची संकल्पना महिला व मुलींसाठी हक्क, समानता आणि सक्षमीकरण अशी असल्याचे सांगितले. यानुसार महिलांनी स्वतः काम केले तर त्या आपले आयुष्य अधिक उन्नतपणे आणि आनंदाने जगू शकतात. यासाठी महिलांनी दिवसातील किमान दोन तास स्वतःसाठी काढले पाहिजेत. रोज थोडा का होईना शरीराला व्यायाम दिलाच पाहिजे. दिवसभरात किमान थोडा वेळ वाचनात घालवला पाहिजे आणि थोडा वेळ आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी करा. जेणेकरून मन आणि शरीर निरोगी राहिल.
कराओके स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कृपा कारेकर, द्वितीय ईश्वरी पाटील, तृतीय श्रेया सूर्यवंशी तर भक्ती सुतार आणि लता पाध्ये यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. रांगोळी स्पर्धेमध्ये शैलजा गिरी गोसावी यांना प्रथम, प्राजक्ता कारंडे द्वितीय, तेजस्विनी कुलकर्णी तृतीय, प्रेरणा कवठेकर आणि रेश्मा कुंभार उत्तेजनार्थ तर श्रावणी सासनेना परीक्षकांनी विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक दिले.संस्थेचे सचिव ओंकार गोसावी यांनी आभार प्रदर्शन केले. रश्मी साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. वेदा सोनुले यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली .या स्पर्धांचे नियोजन संतोष जोशी, ऋतुराज नडाळे, योगेश जोशी, अनिकेत अतिग्रे ,युवराज सुतारआदींनी केले होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विजयसिंह खाडे पाटील, चंद्रकांत घाडगे, अशोक लोहार, अमृत लोहार यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.