केआयटीच्या अभिग्यानमध्ये उलगडली कर्तबगारांच्या यशाची कहाणी
schedule09 Nov 25 person by visibility 59 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोण उद्योग व्यवसायात नावाजलेले तर कोण सिनेमा क्षेत्रात काम करणारे ...कोण आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक तर कोण तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर... विविध माध्यमात काम करणाऱ्या कर्तबगारांच्या मुलाखतीतून विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रे आणि त्यातील संधी यांचे जणू दालन खुले झाले. शिवाय विविध क्षेत्रांची ओळख जवळून घडली. निमित होते, कोल्हापुरातील नामांकित शैक्षणिक संस्था समजल्या जाणाऱ्या केआयटी कॉलेजच्या अभियान 2025 चे ! सायबर येथील आनंद भवन येथे रविवारी दिवसभर ही परिषद झाली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदीप वासलेकर यांनी जगभरातील चाललेल्या बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींबाबत भाष्य केले. वेगवेगळ्या विषयात जगभर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण क्लिष्ट प्रश्नांची सोडवणूक कशी करू शकतो याबाबतही त्यांनी काही उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली. भारतीय तत्त्वज्ञान, निष्काम कर्मयोग, वसुधैव कुटुंबकम, आत्म र्शन आणि दूरदृष्टी या पंचसूत्रीच्या आधारे आपण जगातील कोणत्याही समस्येचे उत्तम निर्वाहन करू शकतो असे सांगितले. यश -अपयश हे यशस्वी आयुष्याचे परिमाण नाही त्या ऐवजी योग्य आणि अयोग्य हेच यशस्वी जीवनाचे परिमाण आहे असे त्यांनी आग्रहाने मत व्यक्त केले.
क्विक हिल या कंपनीचे निर्माते उद्योजक संजय काटकर यांनी आपला उद्योजकीय प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. रिव्हर्स इंजीनियरिंग व प्रॅक्टिकल अनुभव तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या विविध संगणकीय क्षेत्रातील विकासाच्या विषयात विद्यार्थ्यांनी जागृत राहून कार्य केले पाहिजे असा आग्रह केला.
पत्रकारिता क्षेत्रातील तरुण चेहरा विलास बढे यांनी आयुष्याची कमाई मिळवलेला पैसा, मिळालेले फॉलोवर्स, मिळालेले लाइक्स नसून नाती, प्रेम, जोडलेली माणसं आणि देशाच्या विकासासाठी केलेले योगदान हेच आहे असे त्यांनी आग्रहाने मत व्यक्त केले. कबड्डीच्या खेळाप्रमाणे अंतिम श्वासापर्यंत हार न मानणे, प्रतिस्पर्धी व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवून तिथून बाहेर पडण्याचे धाडस करणे हे जसे कबड्डी शिकवते.
बदलते तंत्र आणि त्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची भूमिका या विषयावर अत्यंत वेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत व उदाहरणांनी रंगत आणली ती चौथ्या सेशनने वक्ते होते चिन्मय गव्हाणकर. जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलते तेव्हा स्वाभाविक सुरुवातीला त्याची भीती असते त्याच्याबद्दल गैरसमज असतात पण हळूहळू हे सगळे गैरसमज बाजूला होऊन यातून मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते.
अभिनय क्षेत्रातील तरुण चेहरा अभिनय बेर्डे यांची अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने झालेल्या या संवादात अभिनयने आपला प्रवास या प्रवासातील चढ उतार या प्रवासात विविध लोकांनी केलेले सहकार्य मार्गदर्शन याबाबत गप्पा मारल्या. अभिनय क्षेत्रात जर काम करायचे असेल तर आपली अभिनयातील बाजू ही भक्कम असली पाहिजे तरच लोक तुम्हाला काम देतात असे प्रांजळ मग व्यक्त केले. भारतीय संरक्षण दलाचे निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी संरक्षण दले व त्यातील अभियंत्यांची भूमिका याबाबत आपले अनुभव मांडले. विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी होऊन आपले अभियांत्रिकी कौशल्य देश संरक्षणासाठी वापरावे अशा प्रकारचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
दिवसभराच्या या विविध पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली,सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी, रजिस्टर डॉ.दत्तात्रेय साठे उपस्थित होते. आदित्य साळुंखे व समीक्षा बुधले यांनी प्रास्ताविक केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रमोद पाटील यांनी केले.