अभिमानने उंचावली वळसंगची मान, गावकऱ्यांनी काढली वाजतगाजत मिरवणूक
schedule09 Nov 25 person by visibility 131 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गावातील प्रमुख चौकात उभारलेला अभिनंदनाचा डिजीटल फलक, स्वागतासाठी जमलेले नागरिक, गावातून वाजतगाजत काढलेली मिरवणूक आणि शाळेत रंगलेला कौतुक सोहळा…हे चित्र होते, सीए परीक्षेत यशस्वी झालेल्या अभिमान गुरुबाळ माळी यांच्या सत्काराचे.
वळसंगचे सुपूत्र व ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांचे चिरंजीव अभिमान माळी यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेत कोल्हापूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला. यानिमित्त वळसंग येथे शनिवारी (८ नोव्हेंबर २०२५) सत्कार सोहळयाचे आयोजन केले होते. वळसंग ग्रामपंचायत, श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल, ग्रामस्थ, भिमराव जोती चव्हाण क्रेडीट सोसायटी, वगरे उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारंभाला गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल येथे सत्कार सोहळा झाला.
श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी चेअरमन धोंडाप्पा बिराजदार, माजी सरपंच महादेव माळी यांच्या हस्ते आणि गावचे सरपंच पूजा रमेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. शाल, श्रीफळ देऊन सीए अभिमान माळी यांचा सत्कार करण्यात आला. भाषणात साऱ्याच जणांनी अभिमानच्या कामगिरीचे कौतुक केले. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास अभिमानचे गावात आगमन झाले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पा यादव, सेवानिवृत्त शिक्षक तम्माण्णा मासाळ, माजी सैनिक महादेव सांयार, दुंडाप्पा कुंभार, इरगोंडा बिराजदार, मेहबूब काकतीकर, कांतू बिराजदार, सामाजिक युवा कार्यकर्ते रमेश माळी, केंचराव वगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदैवत केंचराया देवस्थान येथेही सत्कार झाला. डॉ. हुच्चाप्पा टिळे मुकुंद चव्हाण सर यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेत झालेल्या सत्कार सोह्ळयात बोलताना धोंडाप्पा बिराजदार, वसंत यादव, मुख्याध्यापक गणी काकतीकर यांनी ‘३५ वर्षापूर्वी गावचे सुपूत्र व संस्थेचे सध्याचे चेअरमन एस. व्ही. माळी यांनी सीए परीक्षेत यश कमवित ग्रामीण भागातील तरुणाईसमोर नवा आदर्श निर्माण केला होता. त्यांनतर पुन्हा एकदा माळी कुटुंबांतील तरुणांने सीए परीक्षा उत्तीर्ण होत गुणवत्तेची परंपरा पुढे चालविली, ते गावासाठी अभिमानस्पद आहे.’ अशा भावना व्यक्त केल्या.
सरपंच पूजा माळी यांनी अभिमान माळी यांनी मिळवलेले यश हे गावासाठी अभिमानस्प आहे. त्यांनी कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक मिळवत वळसंगचे नाव उंचावले अशा शब्दांत गौरव केला. पत्रकार गुरुबाळ माळी यांनी भाषणात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘जीवनात यश मिळवायचं असेल तर जिद्द, चिकाटी महत्वाची आहे. ध्येय निश्चित करा, त्याला कष्टाची साथ द्या. मी ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेत माझ्या मुलाचा कौतुक सोहळा होत आहे. यासारखा दुसरा आनंद नाही.’अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
सीए अभिमान माळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सीए परीक्षेची तयारी, अभ्यासक्रम यासंबंधी सांगितले. ‘शिक्षण घेत असताना आपले ध्येय निश्चित करा. अभ्यासात सातत्य, प्रामाणिकपणा आणि जिद्द या त्रिसुत्रीचा मिलाफ घडल्यास जीवनात यश दूर नाही. महत्वाचं म्हणचे, आपल्यामुळे आई-वडिलांना सन्मानाचे व्यासपीठ मिळणे, आयुष्यात आणखी दुसरे काय हवे ? मुलांच्या कर्तबगारीने आई-वडिलांचा सन्मान होणं हा मुलांच्या जीवनातील सगळयात मोठा आनंद आहे.’ अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, भिमसेन माळी, कृष्णा टिळे विश्वनाथ माळी, तानाजी चव्हाण, महादेव चव्हाण, गोपाल बिराजदार, राम साळे, ग्रामविकास अधिकारी पैगंबर नदाफ, दिपक चव्हाण, बापू पाटील, राजू व्हनखंडे दिनेश सावंत, केंचराव कांबळे, विनायक कुलकर्णी, चिदानंद माळी, गुंडू नापिक, इरान्ना सुतार, राजू बंडगर, केंचराव मोटे, अमोल कांबळे, सतीश मुचंडी उपस्थित होते.