पाटबंधारे विभागातील लिपीक राजाराम गंधवाले अपघातात ठार, देवदर्शन करुन येताना अपघात
schedule09 Nov 25 person by visibility 437 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शनिवारी, संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्त आसुर्ले पोर्ले, कोतोली येथील पाच-सहा मित्र एकत्रित देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेले. देवदर्शन झाल्यानंतर रात्री साडे आठवाजता पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला. सगळेजण रात्री दहा वाजता साखरपा येथे जेवण केले. काही वेळ विश्रांती घेऊन सगळेजण पुन्हा गावाकडे निघाले. कोतोली फाटा येथे सगळे मित्र उतरले. प्रत्येकजण आपआपल्या गाडीने घराकडे रवाना झाले. कोतोली येथील राजाराम दिनकर गंधवाले (वय 37 वर्षे) आपल्या चारचाकीतून घराकडे निघत असताना नायरा पेट्रोल पंपानजीक ऊसाच्या ट्रॉलीला झालेल्या धडक बसली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या ् प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
रविवारी पहाटे तीन-साडेतीन वाजण्याच्या या सुमारास हा अपघात घडला. गंधवाले हे पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपीक होते. त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी कोतोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजाराम गंधवाले हे कोतोली को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक होते. पाटबंधारे विभागात नोकरी करत होते. ते आपल्या मित्रासहित शनिवारी दुपारी गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी गणपतीपुळ येथे पोहोचले. रात्री साडे आठ वाजता देवदर्शन घेतले. देवदर्शन झाल्यावर सगळे मित्र पुन्हा एकत्रित परतत होते. साखरपा येथे रात्री दहा वाजता साऱ्यांनी जेवण केले. तेथून काही वेळाने पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाले. पहाटे तीनच्या सुमारास कोतोली फाटा येथे पोहोचले.
काही जणांनी या ठिकाणी आपआपली वाहने लावली होती. राजाराम गंधवाले आपले चारचाकी वाहन घेऊन कोतोलीकडे निघाले. कोतोली फाटानजीक असलेल्या नायरा पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उभी होती. गंधवाले यांची कार त्या ट्रॉलीवर आदळली. या अपघातामध्ये गंधवाले हे गंभीररित्या जखमी झाले. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होती. यामुळे तत्काळ मदत मिळाली नाही. थोडया वेळाने पोलिसांची गाडी पेट्रोलिंगसाठी फिरत असताना अपघात घडल्याचे दिसले. त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.गावचे पोलिस पाटील व गंधवाले यांच्या कुटुंबीयांना कळविले. शिवाय पुढील उपचारासाठी गंधवाले यांना सीपीआरकडे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, विवाहित बहिण, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.