केएमटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ! सोमवारपासून बस धावणार !!
schedule03 Dec 23 person by visibility 993 categoryमहानगरपालिका
माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या शिष्टाईला यश
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्त्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासह
विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर अखेर मागे घेण्यात आला.
कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध सहा मागण्यांपैकी दोन मागण्या शासनस्तरावर पाठपुरावा करून पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. सोमवारपासून, (चार नोव्हेंबर) केएमटी बस सेवा सुरू राहणार आहे
केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कोल्हापूर शहरातील बस सेवा ठप्प झाली होती. याचा परिणाम विद्यार्थी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला होता. ही बाब ध्यानात घेऊन माजी आमदार महाडिक आणि माजी नगरसेवक कदम यांनी केएमटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल असा विश्वास यावेळी माजी आमदार महाडिक आणि कदम यांनी कर्मचाऱ्यांना चर्चेवेळी दिला होता. त्यानंतर प्रशासनासोबत चर्चा करून मागण्यांवर यशस्वी तोडगा काढण्यात आल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. दरम्यान गेले दोन दिवस या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रविवारी, माजी नगरसेवक सत्यजित कदम, अतिरिक्त केशव जाधव, परिवहन समितीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय सरनाईक, वर्कर्स युनियनचे संजय सरनाईक, जितेंद्र संकपाळ, अंकुश कांबळे, गणेश तेली यांची संयुक्त बैठक झाली.