मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे संगीत महोत्सवास प्रारंभ, शुक्रतारा कार्यक्रमाने जिंकली मने
schedule09 Jan 26 person by visibility 43 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित संस्थेचे माजी अध्यक्ष रसिकाग्रणी स्वर्गीय मदनमोहन लोहिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापन केलेल्या "मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित संगीत महोत्सवाला शुक्रवारी (९ जानेवारी २०२६) प्रारंभ झाला. संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी संगीतबध्द केलेल्या गाण्यांवर आधारित "शुक्रतारा" या कार्यक्रमांतर्गत गायक प्रल्हाद जाधव व शर्वरी जाधव (मुंबई) यांनी सादर केला.
या कार्यक्रमात त्यांनी, ‘भेटी लागी जिवा, श्रावणात घन निळा, बगळ्यांची माळ, शुक्रतारा मंद वारा, एका तळ्यात होती, लळा-जिव्हाळा, सहज सख्या एकदाच, गेले ते दिन गेले, या चिमण्यांनो परत फिरा रे, लाजून हसणे, पंडरीचा दास, जाहल्या काहि चुका, काळ देहासी’ अशी विविध भक्तीगीते, भावगीते व चित्रगीते सादर करुन रसिकांची मने जिंकली. त्यांना, साथसंगत संदेश खेडेकर (तचला) केदार गुळवणी (व्हायोलीन) विक्रम परीट (साईड रिदम) शिवाजी सुतार (की बोर्ड) यांनी केली व कार्यक्रमाचे निवेदन निशात गोंधळी यांनी केली. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ. शीतल धर्माधिकारी व प्रसाद कुलकणी यांची होती.
दरम्यान सकाळच्या सत्रात पंधरा ते ३५ वयोगटांतर्गत राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यभरातून १५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवून दर्जेदार गीते सादर केली. या स्पर्धेमध्ये परिक्षक म्हणून अंजली तेलंग व डॉ.स्वरदा राजोपाध्ये यांनी काम पाहिले. या दोन्ही कार्यक्रमास मंचाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया, संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य एस.एस.चव्हाण, डॉ. शीतल धर्माधिकारी, सतिश कुलकर्णी, डॉ. सी. हेमिनी चांदेलकर, सौ. सुजाता लोहिया व श्रीमती अनेरी लोहिया व कोल्हापूरच्या रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून दाद दिली.