पश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेत
schedule05 Jun 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी कुशल तंत्रज्ञ घडविण्याच्या उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे बजाज ऑटो लिमिटेड, पुणे यांच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'चे उद्घाटन आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. बजाज सी एस आर व्यवस्थापक प्रीयांशी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. पश्चिम महाराष्ट्रातील अशा प्रकारचे हे पहिलेच अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र आहे.
आमदार पाटील म्हणाले, "भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग झपाट्याने विकसित होत असून या क्षेत्रात प्रशिक्षित तंत्रज्ञांची मागणी सातत्याने वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्रात उभारण्यात आलेले हे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र काळाची गरज ओळखून उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे. उपक्रमामुळे स्थानिक युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील."
प्राचार्य साळुंखे म्हणाले, "शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्याची प्रक्रिया आहे. 'सेंटर ऑफ एक्सलन्स इन इलेक्ट्रिक व्हेईकल्स'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी निगडित कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे." संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे म्हणाले " श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था , बजाज ऑटो लिमिटेड, ग्लोबल टॅलेंट ट्रॅक यांचे हे सहकार्य कौशल्याधारित शिक्षणासाठी आदर्श ठरणारे आहे. उद्योग क्षेत्राच्या अपेक्षांनुसार प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामासाठी सक्षम बनविण्याची क्षमता या केंद्रात आहे. "
ग्लोबल टॅलेंट ट्रॅक पुणेचे सिनिअर डायरेक्टर (ऑपरेशन्स) अमित भोसले., काळे बजाज कोल्हापूरचे संचालक विप्लव कासलीवाल यांनी मनोगत व्यक्त केले. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे, केंद्राचे समन्वयक प्रा. अभिजित रेडेकर यांनी केंद्राच्या उभारणीची माहिती दिली. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, प्रा. डॉ. महेश साळुंखे , बजाज टू-व्हीलर वाहनांचे अधिकृत विक्रेते, रजिस्ट्रार अमित आवाड उपस्थित होते. प्रा. आरती चव्हाण यांनी आभार मानले.