शाहू जयंतीदिनी कोल्हापूरकरांना मोठी विकास भेट मिळणार, मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांच्या लोकार्पणाचा मानस : आमदार राजेश क्षीरसागर
schedule05 Jun 26 person by visibility 6 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर, दि.०५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहराला कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातून पूर्णत्वास येत असलेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच विविध कामांचा शुभारंभ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी अर्थात २६ जून रोजी करण्याचा आमचा मानस आहे. त्याअनुषंगाने सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही सर्व कामे उच्च दर्जाची ठेवून वेळेत पूर्ण करावेत. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण करून राजर्षी शाहू जयंतीदिनी कोल्हापूरकरांना ही मोठी विकास भेट देता येईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केले होते. आमदार क्षीरसागर यांनी, ‘रंकाळा तलाव येथील म्युझिकल फौंऊटेन, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, गांधी मैदान जलनिस्सारण प्रकल्प, शहरातील शाहूकालीन तालीम संस्थांच्या पुर्नबांधणी केलेल्या इमारती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग इमारत, १०० ई बसेस, अमृत योजनेतून बसविण्यात आलेले एस.टी.पी. प्लांट आदी पूर्णत्वास येत आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा यासह पूरनियंत्रण प्रकल्पाचा पहिला टप्पा, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक या कामांचा उद्घाटन सोहळा समाविष्ठ आहे.
या विकास कामांमुळे कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असून, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. येत्या २६ जून रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त किंवा ८ ऑगस्ट या रंगकर्मी दिनानिमित्त मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची वेळ घेवून लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येईल, अशी माहिती दिली. या बैठकीस जिल्हाधिकारी विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, शहरअभियंता रमेश मस्कर, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मिरजकर, उपअभियंता इंगवले, मनपा प्रकल्पअधिकारी सुरेश पाटील आदी उपस्थित होते.