महाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावा
schedule05 Jun 26 person by visibility 11 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाव्दार रोडवरील वाहतूक कोंडी कमी करणेसाठी बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी व सरस्वती टॉकीज ते महाव्दार चौक मार्गे पापाची तिकटी हे दोन रस्ते रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी बंद केले असले तरी या दोन्ही रस्त्यांवर व्यापार मोठ्या प्रमाणात असून रिक्षा व चारचाकी वाहनांसाठी वाहतूक बंद निर्णयामुळे व्यापारावर मोठा परिणाम होत असल्याने दोन्ही रस्ते रिक्षा व चारचाकींसाठी खुले करावेत याबाबतचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस निरिक्षक नंदकुमार मोरे व पोलीस उपाधिक्षक ज्ञानेश गवई यांच्याकडे केली.
चेंबर ऑफ कॉमर्सच अध्यक्ष संजय शेटे, प्रशांत शिंदे, विज्ञानंद मुंढे, धनंजय दुग्गे, संपत पाटील, राहुल नष्टे, शाम जोशी, डॉ गुरुदत्त म्हाडगुत, विजय नारायणपुरे,सागर कदम, महेश डोईफोडे, दिपक गुळवणी यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे, ‘या स्त्यांवर व्यापारी पूर्वापार आपला व्यवसाय करत आहेत. त्यांच्या व्यवसायावर या निर्णयामुळे फार मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांवर भांडी, कापड दुकान, कन्झ्युमर प्रोडक्ट तसेच कपिलतीर्थ मार्केट येथे किराणा व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. भांड्यांचा माल, कापडाचे गट्टे, बॉक्स यांची वाहतूक टेम्पो, रिक्षा अशा वाहनांतूनच करावी लागते. कपिलतीर्थ मार्केट मधील किराणा व्यापाऱ्यांचा माल तर मोठ्या पोत्यात भरुन मोठ्या वाहनातून आणावा लागतो. या वाहनांना हे रस्ते बंद असल्याने व्यापाऱ्यांना माल आस्थापनेत आणता येत नाही व डिलिव्हरीही देता येत नाही. तसेच ट्रक व तत्सम वाहनांना शहरांतर्गत वाहतूकीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत मनाई आहे त्याचाही फटका व्यापाऱ्यांना काही वर्षांपासून बसत आहे.
वाहतूक कोंडीचा विचार करुन बिनखांबी गणेश मंदिर ते महाव्दार रोड हा मार्ग पूर्वीपासून एकेरी मार्ग केला आहे. या रस्त्यावर एकेरी मार्गाचा अवलंब होताना दिसत नाही. अनेक दुचाकींसह इतर वाहनधारक या एकेरी मार्गाचा भंग करत आपली वाहने महाव्दार रोड वर चालवतात. त्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो याचा विचार व्हावा. महाव्दार रोड वर रिक्षा व चारकींसाठी मनाई करण्यामागील उद्देश स्पष्ट होण्याची गरज आहे.’