महापालिकेवर महायुतीचा झेंडा, समर्थकांच्या जल्लोषाला उधाण
schedule06 Feb 26 person by visibility 251 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीमध्ये अपेक्षाप्रमाणे महायुतीने बाजी मारली. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका रूपाराणी निकम यांची महापौरपदी तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची उपमहापौरपदी निवड झाली. या निवडीनंतर महापालिकेसमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम जय घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या जल्लोषामध्ये युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, महापौर निकम यांचे पती संग्राम निकम, उपमहापौर अक्षय यांचे वडील विक्रम जरग यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले. महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत निकम व जरग यांना 46 मते पडली. काँग्रेस आघाडीचे महापौर व उपमहापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे सुनील शेंडे व दुर्वास कदम यांना प्रत्येकी 35 मते पडली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.