सांगलीत सोळा फेब्रुवारीपासून राज्य कला प्रदर्शन, १२७५ कलाकृतींचे प्रदर्शन
schedule12 Feb 26 person by visibility 27 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: दृश्य कला क्षेत्रातील विद्यार्थी व उदयोन्मुख कलाकारांना आपली कला व्यापक स्तरावर सादर करता यावी, त्यांच्या सुप्त कला गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि त्याच्या प्रतिभाशक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी विद्यार्थी विभागाचे ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन १६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत "कला विश्व महाविद्यालय, शांतिनिकेतन, सांगली येथे आयोजित केले आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. ही माहिती कला संचालनालय महाराष्ट्र राज्यचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी दिली आहे.
प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सुमारे २० वर्षांनंतर सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे आयोजन होत आहे. हे प्रदर्शन सांगली येथे होण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. कला संचालक डॉ. किशोर इंगळे म्हणाले, प्रदर्शन एकूण आठ विभागात असणार आहे. यामध्ये रेखा व रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला, मुद्राचित्रण, कला शिक्षक प्रशिक्षण, कला व हस्त व्यवसाय (धातूकाम, अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम), मूलभूत अभ्यासक्रम आणि दिव्यांग विभाग याचा समावेश आहे. प्रत्येक विभागातून चार कलाकृतींची पारितोषिकांसाठी निवड केली जाते. या वर्षी राज्यातील विविध कला संस्थांमधून ३ हजार ४९० विद्यार्थ्यांच्या एकूण ५ हजार ६८० कलाकृती प्राप्त झाल्या. प्राप्त कलाकृतीपैकी १ हजार २७५ कलाकृतींची निवड प्रदर्शन समितीने केली आहे. शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील प्रथम प्रत्येकी ५ याप्रमाणे एकूण १० आणि बाल चित्रकला स्पर्धेतील राज्यस्तरावरील १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रथमच राज्य कला प्रदर्शनाच्या व्यासपीठावर केला जात आहे. सात दिवस चालणारे हे कला प्रदर्शन सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.