कोल्हापुरात रंगणार पुजाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा, विविध जिल्ह्यातील बारा संघांचा सहभाग
schedule12 Feb 26 person by visibility 31 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरसह विविध जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थानमधील पुजारी व कर्मचाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा चौदा ते सोळा फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होत आहे. कोल्हापूरातील शास्त्रीनगर मैदान येथे 'मंदिर प्रीमियर लीग' पर्व २ रे या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण बारा संघांचा सहभाग असल्याची माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष मकरंद मुनीश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुनिश्वर म्हणाले, ‘या स्पर्धेत करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान, कोल्हापुरातील ओढ्यावरचा गणपती श्री क्षेत्र जोतिबा, नृसिंहवाडी, तुळजापूर देवस्थान येथील दोन संघ आहेत. तसेच पंढरपूर, माहूरगड, शिर्डी, सारबाग पुणे येथील महालक्ष्मी मंदिरातील पुजारी व कर्मचाऱ्यांचे संघ सहभागी होणार आहेत. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थानचे श्रीपूजक व कर्मचारी मिळून दोन संघ स्पर्धेत उतरणार आहेत. याशिवाय परशुराम सोशल फाऊंडेशनचा संघही आहे.
या स्पर्धा डे नाईट खेळवल्या जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख बक्षीस व चषक प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २५५५५ रुपये व चषक, उपविजेत्या संघास २११११ रुपये व चषक तर तृतीय क्रमांकाच्या संघास १५५५५ रुपये व चषक असे बक्षीस आहे. तसेच खेळाडूंना वैयक्तिक स्वरुपातही बक्षीसे आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या संघातील खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. स्पर्धेचे उद्घाटन १४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते होणार आहे. पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष लाभेश मुनीश्वर, सचिव मयूर मुनीश्वर, कार्याध्यक्ष विनायक चव्हाण, सदस्य चैतन्य अष्टेकर, रोहन दातार, अमित दिवाण, शरद मुनीश्वर उपस्थित होते.