कोल्हापूर पर्यटनासाठी विशेष गाडी, शहरातील चौक सुशोभिकरणाचा करणार आराखडा !! अमल महाडिकांनी केले आश्वस्त !!
schedule12 Dec 24 person by visibility 793 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील हेरिटेज वास्तूंचे जतन आणि नूतनीकरण, लेसर आणि साऊंड शो, कोल्हापूर पर्यटनासाठी विशेष गाडी, शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरणसाठी कृती आराखडा तयार करण्याचे ठरले. आमदार अमल महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. प्रत्येक विभागासाठी वेगवेगळ्या कृती समिती स्थापन करू व सर्व समस्यावर तोडगा काढू अशा शब्दांत आमदार महाडिक यांनी नागरिकांना आश्वस्त केले.
येथील मॉर्निंग मंत्रा फाउंडेशनच्या सदस्यांची आमदार महाडिक यांच्यासोबत पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्या आणि कोल्हापूरतील पर्यटन हे डेस्टिनेशन म्हणून अधिक प्रिय कसे करता येईल याविषयी चर्चा झाली. मॉर्निंग मंत्राचे हेरंब परांजपे, अतुल पाटील, वैभव कुलकर्णी, दीपक शिरोडकर, प्रताप पाटील, स्वप्नील रामनामे, अभिजीत कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते. सध्याच्या काळात स्टार एअरलाइनच्या विमानसेवा या अचानक व वारंवार होणाऱ्या रद्द होण्यामुळे प्रवासी व पर्यटकांना याना मोठ्या आर्थिक नुकसानीला आणि मनस्तापला तोंड द्यावे लागत आहे. हॉटेल्स बुकिंग, पर्यटन वाहनांचे बुकिंग तसेच टूर कार्यक्रम यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे संबंधितांनी सांगितले.
तसेच गेल्या चार वर्षापासून बंद असलेली कोल्हापूर - मुंबई सह्याद्री एक्सप्रेस ही तातडीने करावी. कोल्हापुरातून आठवड्यातून एकदा सुटणाऱ्या निजामुद्दीन व अहमदाबाद या एक्सप्रेस दररोज सुरू कराव्यात. मिरजेतून सुटणारी राणी चन्नम्मा एक्सप्रेस पूर्ववत कोल्हापुरातून सोडावी. जयपूर, कोलकत्ता, त्रिवेंद्रम व एरणाकुलम या ठिकाणी कोल्हापुरातून रेल्वे सेवा सुरू व्हाव्यात. # कोल्हापुरात वंदे भरत रेल्वे मुंबईपर्यंत असावी यासह विविध मागण्यासंबंधी सकारात्मक तोडगा काढू अशी ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली.
.