महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “साहित्य आणि समाजाचा निकटचा संबध आहे. साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो. साहित्यिकांच्या लिखाणात भविष्यकालीन घटनांची नांदी उमटत असते. भवताल टिपत असताना समाज जागृतीचे कार्य ही साहित्यातून होत असते. अशा लेखकांना साहित्य निर्मितीसाठी पुरस्काररुपी बळ देत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे.”असे गौरवोद्गार शिक्षणतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी काढले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे आयोजित विविध पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी (२५ मे) झाला. पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक चंद्रकुमार नलगे होते. येथील शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी डॉ. दिलीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कारप्राप्त कवींचे संमेलन झाले.
दमसातर्फे २०२२ मधील उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी विविध पुरस्कार देण्यात आले. यामध्ये लेखक वसंत गायकवाड (कादंबरी-तथागत गौतम बुद्ध), जयवंत आवटे (कथासंग्रह - बारा गावचे संचित), सीताराम सावंत (हवलेल्या कथेच्या शोधात), विनायक होगाडे (संकीर्ण -डिअर तुकोबा), आबासाहेब पाटील (कवितासंग्रह –घामाची ओल धरुन), कविना ननवरे (कवितासंग्रह) आणि वंदना हुळबत्ते यांना पुरस्कार देण्यात आले. विशेष पुरस्कार यादीमध्ये रा. तु. भगत (संत गाडगेबाबा समग्र ग्रंथ), व्यंकाप्पा भोसले (राजर्षी शाहू आणि भटके विमुक्त), अच्युत माने (जीवनरंग), बी. एम. हिर्डेकर (पाषाणपालवी), सुभाष् ढग (लढवया), गणपती कमळकर (ऑनलाइन शिक्षण पद्धती), प्रशांत गायकवाड (सत्य असत्याशी मन केले ग्वाही), रामकली पावसकर
(रे आभाळा), गौतम जाधव (आदिवासी कवितेचा परामर्श), प्रकाश काशीद (संचित), अभिजीत पाटील (आवडलं ते निवडलं), वैष्णवी अंदूरकर (थेंबातला समुद्र), विकास गुजर (बाभूळमाया), पत्रकार गुरुबाळ माळी, आप्पासाहेब माळी, सतीश घाटगे (कोल्हापूरचे महापौर), मेघा रमेश पाटील (सुलवान), राजेंद्र शेंडगे (वर्तुळाच्या आतबाहेर अस्वस्थ मी), हर्षदा सुठंणकर (कपडे वाळत घालणारी बाई), पूजा भंडगे ( ऐहिकाच्या मृगजळात ), प्रणिता शिपूरकर (शाळा सुटली), खंडेराव शिंदे (पकाल्या), शैलजा टिळे-मिरजकर (चैत्रायन), अशोक बापू पवार (वंचितांचे अंतरंग), सिराज शिकलगार (गझलसाया) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दमसातर्फे धम्म्पाल रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार वितरित झाले. यामध्ये पद्मरेखा धनकर (फक्त सैल झालाय दोर), दीपक बोरगावे (भवताल आणि भयताल), कविता मुरुमकर (ऊसवायचय तुझा पाषाण), हबीब भंडारे (मरणाच्या दारात जगण्याचा अर्थ शोधणारी माणसं), गोविंद काजरेकर (सुन्नतेचे सर्ग), राजेंद्र दास (तुकोबा), केशव देशमुख (टिळा), किर्ती पाटसकर (लेखणी सरेंडर होतोय) यांना पुरस्कार दिले. याप्रसंगी परीक्षक डॉ. रवींद्र ठाकुर, डॉ. रफीक सूरज यांनी पुरस्कारप्राप्त लेखक व पुस्काविषयी सांगितले.
दमसाचे अध्यक्ष भीमराव धुळबुळ यांनी स्वागत केले. कार्यकारिणी सदस्य विजय चोरमारे यांनी प्रास्ताविक केले. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. विलास माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कार्याध्यक्ष दि. बा. पाटील, उपाध्यक्ष गौरी भोगले, कार्यवाह विनोद कांबळे, कार्यकारिणी सदस्य पाटलोबा पाटील, विक्रम राजवर्धन आदी उपस्थित होते.