श्रीपतराव बोंद्रेंचे कोल्हापूरच्या विकासाबरोबर स्वातंत्र्य चळवळीत योगदान : डॉ. आर. के. शानेदिवाण
schedule20 Dec 24 person by visibility 25 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव शंकराव बोंद्रे दादा यांचे कोल्हापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. तसेच स्वातंत्र्य चळवळीतही त्यांनी सहभाग नोंदवून क्रांतिसिंह नाना पाटील, जी डी बापू लाड, वसंतरावदादा पाटील यांच्याबरोबर काम केले आहे, असे प्रतिपादन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण यांनी केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था व श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातर्फे कै.श्रीपतराव शंकरराव बोंद्रे आणि कै. विजयराव श्रीपतराव बोंद्रे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कै.श्रीपतराव बोंद्रे दादा स्मृती ऑनलाईन व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. मराठी विभागाचे प्रमुख प्रो. डॉ दीपक कुमार वळवी अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य शानेदिवाण म्हणाले, ‘कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्व पक्ष रुजवण्यात आणि वाढवण्यात श्रीपतराव बोंद्रे यांचा मोठा वाटा आहे. ते काँग्रेसचे एकमेव सदस्य असतानाही कोल्हापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष झाले. केएमटी बस सेवासह अनेक उल्लेखनीय कामे त्यांनी केली. ते प्रयोगशील शेतकरी होते. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने देशातील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था त्यांनी फुलेवाडी येथे सुरू केली. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतील अनेक संकुलांना त्यांनी समाज सुधारकांची नावे दिले आहेत. शेतकऱ्याची मुले राजवाड्यात शिकली पाहिजेत अशी त्यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांनी शहाजी महाविद्यालय सुरुवातीला शालिनी पॅलेस मध्ये सुरू ठेवले होते. राजकारणातील एक चारित्र्यवान व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.’
प्रा. डॉ.विजय देठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शुभम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी. बी. पाटील यांनी आभार मानले. शाहू फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल पाटकर, डॉ. आर. डी. मांडणीकर, डॉ. ए. बी. बलुगडे, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले आदी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे व्याख्यानमालेस प्रोत्साहन मिळाले आहे.