वारणा कारखान्याच्या चेअरमन शोभाताई कोरे यांचे निधन
schedule12 Oct 20 person by visibility 999 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती शोभाताई विलासराव कोरे यांचे सोमवारी,( ता.१२ ऑक्टोबर)सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ७९ वर्षाच्या होत्या. वारणा परिसरात त्या आईसाहेब म्हणून परिचित होत्या. वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत.
श्रीमती शोभाताई कोरे यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नव्हती. त्यांच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू होते. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर वारणानगर येथील स्मृति भवन, वारणा बँकेच्या पाठीमागे दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वारणा उद्योग समूह आणि त्या माध्यमातून परिसराचा विकास यासाठी त्यांनी योगदान दिले.वारणा भगिनी मंडळ व वारणा बझारच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. कारखान्याच्या चेअरमनपदी त्या सक्रिय होत्या. वारणा पंचक्रोशीतील सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी असायच्या. वारणा भगिनी मंडळ व वारणा बझारच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यात त्यांचा पुढाकार होता.