शरद पवारांनी केली साहित्य संमेलन स्थळाची पाहणी
schedule18 Dec 24 person by visibility 37 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सरहद पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे भरणार आहे. संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली.
या पाहणीसाठी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ . शैलेश पगारिया, अतुल बोकरीया, प्रदीप पाटील,लेशपाल जवळगे उपस्थित होते. शरद पवार यांनी संमेलनस्थळावर उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. तलकटोरा स्टेडियममध्ये किती लोक येऊ शकतात, त्यांची बसण्याची, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था कशी होईल याची पाहणी त्यांनी केली. पुस्तक प्रदर्शन स्थळ, कवीकट्टा आदींची स्थळ पाहणी त्यांनी केली
'महाराष्ट्र ही सलोख्याची आणि समन्वयाची भूमी आहे. देशाच्या राजधानीत संमेलन होत असताना महाराष्ट्राच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करून मराठी साहित्याला जागतिक व्यासपीठावर कसे नेता येईल', यादृष्टीने प्रयत्न या संमेलनाच्या अनुषंगाने करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
संमेलनाचे सुसज्ज आयोजन व व्यवस्थापनासाठी सुसज्ज टीम, तांत्रिक सुविधा आणि उपस्थित साहित्य रसिकांच्या दृष्टीने हे संमेलन स्मरणीय कसे होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात येत असून हे संमेलन मराठी साहित्याचा अनोखा सोहळा ठरणार असून त्यातून मराठी साहित्य आणि सांस्कृतिक बंध विस्तारेल, असं संजय नहार यांनी यावेळी सांगितले.