समूहभाव -सहानुभाव हे खेडयांचे मूलतत्व, मात्र संवेदनाशून्य नव मध्यमवर्गाला हा गावगाडाच समजला नाही : राजन गवस
schedule30 Jan 26 person by visibility 31 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘समूहभाव आणि सहानुभाव हे खेडयांचे मूलतत्व आहे. गाव एक समूह आहे आणि पशु-पक्षी जगली पाहिजेत, जंगली वाचली पाहिजेत. तरच जगण्याला अर्थ आहे. किडया मुंग्याना जेवढा जगण्याचा अधिकार तेवढाच मलाही अधिकार या सहानुभावावर खेडेगाव उभी आहेत. मात्र गेल्या काही वर्षात चंगळवादाकडे झुकलेला व संवेदनाशून्यू असा जो नवमध्यमवर्ग निर्माण झाला, त्यांनी समूहभाव आणि सहानुभावची जबाबदारी नीट पार पाडली नाही. या नवमध्यमवर्गाने ‘आतला-बाहेरचा’ गावगाडाच समजून घेतला नाही. यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले’असे मत प्रसिद्ध साहित्ियक राजन गवस यांनी व्यक्त केले.
’लोकमतचे पत्रकार विश्वास शामराव पाटील लिखित ‘फेरा जन्म मृत्यूचा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. साहित्यिक गवस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ज्येष्ठ संपादक वसंत भोसले हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकमत कोल्हापूरचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, प्रकाशक भाग्यश्री पाटील, महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी सायंकाळी प्रकाशन वितरण समारंभ झाला.
याप्रसंगी बोलताना साहित्यिक गवस यांनी मुक्तचिंतन केले. सध्याची सामाजिक स्थिती, बदलते ग्रामजीवन, आत्मकेंद्रित नव मध्यमवर्ग यावर ऊहापोह करताना ते म्हणाले,‘ गाव हा एक समूह आहे. जे जे असेल ते गावचे, समूहाचे. या समूहभाव आणि सगळयासहित जगण्याचा सहानुभाव हा ग्रामजीवनाचा, खेडयांचा मूळ स्वभाव आणि मूलतत्व. मात्र आंग्ल संदर्भातील शिक्षणातून जो वर्ग तयार झाला. त्यांनी खेडी किती समजून घेतली ? त्यांना गावगाडा किती समजला.प्रत्येक गावगाडयामध्ये एक गाव आत असतो, एक गाव बाहेर असतो. आतला बाहेरचा हा गावगाडा समजून घ्यायला हवा होता. मात्र नव मध्यमवर्गाने साऱ्यांनाच अंतरावर ठेवले.त्यांना समूहभाव आणि सहानुभाव माहित नाही. त्यांनी किडया मुग्यांना बाहेर ठेवलं. भयंकर म्हणजे, त्यांना सोबत आई बापही चालत नाहीत. संवेदनाशून्य आणि चंगळवादी वृत्तीत वाढीस लागली. खेडयातील शिकलेल्या पोरांनीही आपली जबाबदारी पार पाडली नाही.’
संपादक वसंत भोसले यांनीही सध्याच्या बदलत्या स्थितीवर भाष्य करताना जे समाजहिताचं आहे, कसदार आहे. त्याच्या पाठीशी समाजाने उभं राहावे. पत्रकार विश्वास पाटील यांनी समाजहित केंद्रस्थानी ठेवून बंडखोरी वृत्तीने प्रबोधनात्मक लिखाण केले आहे. निश्चितच ते समाजाला उपयुक्त ठरणारे आहे.’असे नमूद केले. लेखक व पत्रकार पाटील यांनी, ‘ कर्मकांड, अंधश्रद्धा, खाेटी प्रतिष्ठा यामुळे समाज जीवनावर होणारा परिणाम हा अस्वस्थ करणारा आहे. समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वत: पासून करायला हवी. समाजात शिक्षित, नवं मध्यमवर्ग जो तयार झाला आहे तो कर्मकांड व अंधश्रद्धेत गुरफटत आहे. श्रद्धा जरुर असावी, पण अंधश्रद्धा व कर्मकांडाकडे झूकू नये. समाजातील ढोंगीपणा, दांभिकतेवर शाब्दिक प्रहार करताना समाजातील चांगुलपणा, बदलाचे वारे नेमकेपणाने टिपत ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.’ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी आभार मानले.