शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचा पर्यावरणपूरक उपक्रम, एक हजार विद्यार्थी बनले पृथ्वी दूत
schedule30 Jan 26 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने पारंपरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक उपक्रमांचे धडे शिकवण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरणाविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण व्हावी,, धरतीमातेच्या संरक्षणाची भूमिका प्रत्येकाने अंगिकारवी यासाठी शहीद शिक्षण प्रसारक मंडळाने तब्बल एक हजार विद्यार्थ्यांना पृथ्वी दूत म्हणून काम करण्याची शपथ दिली. शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी २९ जानेवारी हा दिवस ‘पृथ्वी संरक्षण दिन’ म्हणून साजरा केला जातो.
मिशन एंजल फॉर अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट या संकल्पने अंतर्गत शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या एक हजार विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये दहा झाडे लावण्याचा तसेच दहा दुर्मिळ झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वनसंपदा संरक्षण, हरित ऊर्जा, प्लास्टिक व रासायनिक प्रदूषणाला आळा, आणि पर्यावरण पूरक जीवनशैली या पंचसूत्रीचा पुरस्कार हे नव्या पिढीचे पृथ्वीदूत करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या.
जागतिक शिक्षणतज्ज्ञ व आशिया पॅसीफिक क्वॉलिटी नेटवर्कचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ पाटील यांनी, ‘सध्या संपूर्ण जग पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात असताना निसर्ग संवर्धनासाठी सक्रिय सहभाग घेणे काळाची गरज आहे. त्यामुळे आज शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पृथ्वी दूत म्हणून घेतलेली शपथ उद्या जागतिक पातळीवर घेतली जाईल. केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरता हा संकल्प नसून आशिया खंडातील अनेक संस्था यामध्ये सहभागी होतील. येत्या काळात आशिया खंडामध्ये लाखो वृक्षांची लागवड आणि संवर्धन केले जाईल, ’असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, शहीद सिताराम कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्राचार्या स्नेहल माळी, शहीद सिताराम पाटील कॉलेज ऑफ पीजीच्या प्राचार्या सिद्धता गौड, शहीद सिताराम कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य हिमांशू चव्हाण, मुक्ताई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सरिता धनवडे, शहीद पब्लिक स्कूलचे प्राचार्य जयदीप चरापले, डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार उपस्थित होते.