सतेज पाटील अन् मी खाजगीत मित्र परंतु राजकीय शत्रूच – मंत्री हसन मुश्रीफ
schedule05 Jan 26 person by visibility 80 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर ‘ मी आणि सतेज पाटील आम्ही अनेक वर्ष मित्र होतो. आता आम्ही खाजगीत मित्र आहोत परंतु; राजकीय शत्रूच आहोत. कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता महायुतीला द्या; कोल्हापूर शहराचा स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही. विरोधी महाविकास आघाडीकडे विकासाचा कोणताही अजेंडा नसून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास महायुतीच करेल’असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे दिल्यास शहरात विकासाची गंगा येईल. महायुतीचे सर्वच नगरसेवक गोरगरिबांच्या, सामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवतील. महायुतीचे सरकार हे जनतेची सेवा करणारे सरकार आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. चा शंभर कोटी निधीतून कायापालट होत आहे. येत्या दोन-तीन महिन्यात या थोरल्या दवाखान्याचे रुप मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल यासारखे सुंदर होईल. शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी साकारत आहे. तिथे अकराशे बेडचे हॉस्पिटल निर्माण होत आहे. कोल्हापूरच्या एकाही रुग्णाला मुंबई किंवा पुण्याला उपचारासाठी जावे लागणार नाही.