भाजप जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला, इच्छुकांच्या मुलाखतीला प्रारंभ
schedule06 Jan 26 person by visibility 163 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी, कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाने, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखतींना प्रारंभ झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी, पक्षाकडे ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सहा व सात जानेवारी २०२६ या कालावधीत मुलाखती होत आहेत.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण कराव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने, राज्य निवडणूक आयोगाची धावपळ उडाली आहे. पुढील दोन दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातर्ंगत येणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती ३ दिवस चालणार आहेत. आज कागल, राधानगरी, भुदरगड विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. संपूर्ण जिल्हयातून ६५० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे, अशी माहिती खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सर्व इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर, त्याबद्दलचा अहवाल राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठवण्यात येईल आणि उमेदवारीचा अंतिम निर्णय होईल, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. बुधवारी कोल्हापूर दक्षिण, करवीर, पन्हाळा, गगनबावडा तर गुरूवारी आजरा, गडहिंग्लज, चंदगड या भागातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. खासदार महाडिक, आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी मुलाखती घेतल्या.