ओेंकार जाधवांनी मांडली प्रभागाच्या विकासाची पंचसूत्री
schedule07 Jan 26 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रीय फुटबॉलपटू ओंकार संभाजीराव जाधव यांनी, प्रभाग क्रमांक तेरामधील विकासाची पंचसूत्री मांडली. महायुतीचे उमेदवार म्हणून ते प्रभागातील मतदारांना सामोरे जात आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. बीए, एमबीए पदवी प्राप्त या उच्चशिक्षित उमेदवारांनी प्रभागाच्या विकासाचा अजेंडा तयार केला आहे. संपूर्ण प्रभागाचा विचार करुन सर्व घटकांना डोळयासमोर ठेवून त्यांनी विकास योजनांचा प्राधान्यक्रम ठरविला आहे. प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी, ‘दर्जेदार रस्ते, पाणी पुरवठा व ड्रेनेज व्यवस्था’ची ग्वाही दिली आहे. तसेच, ‘स्वच्छता - आरोग्य व नागरी सुविधा, युवकांसाठी क्रीडा - शिक्षण व रोजगार संधी, महिलांसाठी सुरक्षित - सन्मानजक सुविधा’ अशी विकासाची पंचसूत्री मांडली आहे. ओंकार जाधव यांना समाजकारण व राजकारणाचा कौटुंबीक वारसा आहे. जाधव कुटुंबीय हे गेली कित्येक वर्षे मंगळवार पेठेसह शहरातील विविध भागातील सामाजिक कार्यांना, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहित करत आहे. शिवसेनेने तरुण नेतृत्वाला वाव देत प्रभाग क्रमांक तेरामधून उमेदवारी दिली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव यांच्या कामाचा वारसा समर्थपणे पुढे चालविण्यासाठी ओंकार जाधव प्रयत्नशील आहेत.