अंगारकी संकष्टीला लालपरीची भक्तिमय धाव, कोल्हापूर विभागातर्फे विशेष बस सेवा
schedule06 Jan 26 person by visibility 46 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :अंगारकी संकष्टीनिमित्त श्री क्षेत्र गणपतीपुळे दर्शनासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने भक्तिभाव आणि सेवाभाव यांची सुंदर सांगड घालत विशेष बस सेवेचे आयोजन केले. या अंतर्गत कोल्हापूर आगार व इतर आगारांमधून एकूण ३२ विशेष बसेस कोल्हापूर बसस्थानकावरून गणपतीपुळे येथे रवाना झाल्या. भाविकांचा वाढता उत्साह लक्षात घेऊन ७ व ८ जानेवारी २०२६ या कालावधीत कोल्हापूर विभागाच्या एकूण ४५ जादा बसेस गणपतीपुळे दर्शनासाठी रवाना होणार असून,भविष्यात या संख्येत नक्कीच वाढ होणार आहे.
या भक्तिमय प्रवासाची सुरुवातच जणू प्रसादाने झाली. कोल्हापूर बस स्थानकावर पोहोचलेल्या भाविकांसाठी चंदूकाका सराफ ज्वेलर्स, जनकभाई लछवानी व कोल्हापूर आगाराच्या वतीने फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या उपक्रमाची संकल्पना परिवहन मंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी मांडली असून, कोल्हापूर विभागाने त्याची अत्यंत काटेकोर अंमलबजावणी केली. हा कार्यक्रम विभाग नियंत्रक शअभय देशमुख, यंत्र अभियंता (चालन) यशवंत कानतोडे व विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कामगार अधिकारी संदीप भोसले, उपअभियंता करवंदे, विभागीय भांडार अधिकारी संग्राम शिंदे, आगार व्यवस्थापक अनिल मेहत्तर व प्रमोद तेलवेकर, स्थानक प्रमुख मल्लेश विभुते आणि सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक संकेत जोशी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाहतूक निरीक्षक सारंग जाधव, सहाय्यक वाहतूक निरीक्षक दीपक घारगे, वाहतूक नियंत्रक रणजीत काटकर, राकेश कांबळे, उत्तम पाटील, दीपक सणगरे, शेखर सुर्वे, अमित तावडे, आलोक ढोणे, श्रीकांत चव्हाण, आर. के. चव्हाण व निळकंठ कळंत्रे आदी परिश्रम घेतले.