कोल्हापूर जिल्हा परिषदेचा स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स, शाळेत उभारले अद्ययावत स्वच्छतागृहे
schedule06 Jan 26 person by visibility 361 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘शाळेची इमारत जितकी महत्वाची, तितकेच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे अद्ययावत असायला हवी. विशेषत: मुलींसाठी स्वच्छता सुविधा अत्यावश्यक आहेत.’या विचाराने जिल्हा परिषदेने ‘कोल्हापूर स्टाइल इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स’संकल्पना राबविली आहे. या संकल्पनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० शाळेत मार्च २०२६ पर्यंत अद्ययावत स्वछतागृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ५४ शाळेत स्वछतागृहे उभारली आहेत. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.
पंधराव्या वित्त आयोगातून हा आरोग्य विषयक प्रकल्प राबविला आहे. ज्या शाळेत मुलींच्या संख्या जास्त आहे त्या ठिकाणी आधुनिक स्वच्छता सुविधा निर्माण केल्या आहेत. येत्या पाच वर्षात जिल्हा परिषदेतील सर्व शाळेत इंटिग्रेटेड स्कूल हेल्थ कॉम्प्लेक्स तयार करण्यात येणार असल्याचे सीईओंनी सांगितले. अनावश्यक खर्चाला फाटा देत, आधुनिक पद्धतीने स्वच्छता सुविधा निर्माण केल्या आहत.हेल्थ कॉम्प्लेक्सचे तीन प्रकार केले आहेत. ए वर्गवारीतील कॉम्प्लेक्समध्ये २०० पेक्षा जास्त विद्यार्थी, बी वर्गवारीत समाविष्ठ कॉम्प्लेक्समध्ये १०० ते २०० विद्यार्थी व सी वर्गवारीतील कॉम्प्लेक्समध्ये १०० पेक्षा कमी विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत.
या प्रकल्पासाठी वापरलेले साहित्य केवळ टिकाऊच नाही तर सौंदर्यपूर्ण आहे. मुलींच्या आरोग्य आणि सन्मानाचा विचार करुन विशेष सुविधा केल्या आहेत. या प्रकल्पामुळे शाळेत उपस्थिती वाढेल आणि शिक्षणात सहभाग अधिक राहील असे शिक्षणाधिकारी शेंडकर यांनी म्हटले आहे. हेल्थ कॉम्प्लेक्सच्या नियमित देखभाल व स्वछतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व माजी विद्यार्थी संघटना यांच्या माध्यमातून नियोजन केले जाणार आहे. ’स्वच्छ शाळा म्हणजे आरोग्यदायी समाज या सूत्राने ही संकल्पना राबविली. या प्रकल्पाचे सर्व आराखडे, खर्च व बांधकाम डीएसआरनुसार पूर्ण केले आहे. यासाठी कोणताही जादा निधी उपलब्ध करावा लागला नाही असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.