गोडसाखर कारखान्यात २९ कोटींचा घोटाळा, माजी अध्यक्ष-तीन एमडीसह २१ जणांवर गुन्हा
schedule14 Dec 24 person by visibility 66 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या वैधानिक लेखापरीक्षणात २९ कोटी ७१ लाख ८० हजार रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. कारखान्याच्या रकमेचा अपहार व नुकसानी प्रकरणात माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर (काळभैरी रोड गडहिंग्लज) याला पोलिसांनी अटक केली आहे. वैधानिक लेखापरीक्षक तथा चार्टर्ड अकौटंट सुशांत फडणीस यांनी फिर्याद दिली आहे.
कारखान्यातील आर्थिक अपहार व नुकसानीस जबाबदार असलेल्यामध्ये माजी अध्यक्ष शहापूरकर, मुख्य लेखापाल रेडेकर, तत्कालिन कार्यकारी संचालक औंदुबर रेवणसिद्ध तांबे (पुणे), सुधीर शामराव पाटील (इस्लामपूर), महावीर सिद्धराम घोडके (हाळचिंचोली अक्कलकोट), माजी सचिव कै. मानसिंगराव अनंतराव देसाई (कडगाव रोड गडहिंग्लज), अर्कशाळा प्रमुख रणजीत बाबूराव देसाई (ऐनापूर, गडहिंग्लज), तत्कालिन मुख्य शेती अधिकारी लक्ष्मण भैरू देसाई (लिंगनूर तर्फे नेसरी), तोडणी वाहतूक कंत्राटदार श्रीमंत बसाप्पा पुजारी (नंदनवाड, गडहिंग्लज), राजेंद्र नारायण देसाई (इंचनाळ, गडहिंग्लज), संतोष बंडू पाटील (भादवण आजरा), सयाजी नारायण देसाई व अनिल श्रीकांत भोसले (इंचनाळ गडहिंग्लज),शिवाजी ईश्वर शिंत्रे (बेळगुंदी, गडहिंग्लज), बसवराज मल्लाप्पा आरबोळे (तनवडी, गडहिंग्लज), रुपाली किरण पाटील, महेश विलास ताडे, विलास पांडूरंग ताडे, यल्लाप्पा बोकडे, हनुमंत दादाराव तोंडे , दादाराव जोतिबा तोंडे यांचा समावेश आहे.
प्रशासकीय मंजुरी न घेता अर्कशाळा आधुनिकीकरण, जुना गिअर बॉक्स खरेदी, तोडणी-वाहतूक अॅडव्हान्स, बॉयलर आधुनिकीकरण, टर्बाइन खरेदीतून झालेला अकरा कोटी ४२ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार अशा विविध प्रकरणातून कारखान्याचे नुकसान झाल्याचा आरोप संबंधितावर आहे.