विद्यापीठस्तरीय आविष्कारमध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब
schedule20 Dec 24 person by visibility 86 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये विद्यार्थी व संशोधकांमधील सृजनशीलतेबरोबरच सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब पडल्याचे दिसून आले. या महोत्सवाचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि रसायनशास्त्र अधिविभाग यांनी स्पर्धेचे संयोजन केले. शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याचे उद्दीष्ट बाळगून दरवर्षी आविष्कार संशोधन महोत्सव आयोजित करण्यात येतो. जिल्हास्तरीय महाविद्यालयीन स्पर्धेच्या फेऱ्यांनंतर आज विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सव राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडला.
सद्यस्थितीत मानवी समुदायाला भेडसावणाऱ्या व्यक्तीगत ते स्थानिक सामाजिक समस्यांवर संशोधनाच्या सहाय्याने पर्याय शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असल्याचे दिसून आले. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आज पदवीस्तरीय ५२ आणि संशोधनस्तरीय ५० अशा एकूण १०२ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संशोधनपर प्रकल्प, पोस्टर सादर केले.
पदवी, पदव्युत्तर स्तरीय विद्यार्थी आणि संशोधक अशा तीन स्तरांमध्ये या स्पर्धा वर्गीकृत असून आज पदवीस्तरीय विद्यार्थी आणि संशोधक या दोन गटांतील स्पर्धा झाल्या. मानव्यशास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा, विज्ञान, कृषी आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तसेच वैद्यकीय आणि औषधनिर्माण या सहा श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादरीकरण केले. त्या १२ मॉडेल्सचाही समावेश होता. विशेष म्हणजे यामधील ५४ प्रकल्पांचे सादरीकरण स्टार्टअपसाठी करण्यात आले.