शक्तीपीठ महामार्गविरोधात बुधवारी विधानभवनावर धडक
schedule10 Mar 25 person by visibility 34 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा शक्तीपीठ महामार्ग कदापि होऊ देणार नाही असा एल्गार पुकारत येत्या बुधवारी अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनावर १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समनव्यक गिरीश फोंडे यांनी रविवारी दिली.
आझाद मैदानात सकाळी ९ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. राज्यभरातून या मोर्चाला दहा हजारांहून अधिक शेतकरी येणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, बीड, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच या महामार्गाला विरोध दर्शिवला होता. या महामार्गाविरोधात कोल्हापुरातून वात लागल्याने सत्ताधारी हादरले आहेत. शक्तीपीठ महामार्गाला आमदारांचे समर्थन आहे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आमदारांचे समर्थन आहे हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांनी एकाही शेतकऱ्याशी चर्चा केली नसल्याचा दावा समितीने केला आहे.