कुंभार काम करणा-यांना महापालिकेचा परवाना आवश्यक
schedule04 Jul 25 person by visibility 9 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कुंभार व्यवसायधारकांनी महानगरपालिकेकडून त्यांच्या कामाच्या व्यवसायाचा परवाना घेणे आवश्यक आहे. कुंभार व्यवसायिकांना परवाना घेणे हायकोर्टाचे आदेशान्वये बंधनकारक केले आहे. असे कोल्हापूर महापालिकेच्या परवाना विभागाने म्हटले आहे. याबाबत यापूर्वी शहरातील मुर्तीकार संघटनासोबत झालेल्या बैठकीत स्थायी मिळकत धारकांनी परवाना विभागाकडे व तात्पुरत्या स्वरुपात व्यवसाय करणाऱ्या मुर्तीकार यांनी इस्टेट व पर्यावरण विभागाकडे रितसर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच परवाना विभागाच्यावतीने पत्रकांद्वारे शहरातील सर्व व्यवसाय धारकांना परवाना घेणेबाबत सुचित केले होते. परंतु अद्यापही काही व्यवसायिकांनी महापालिकेचा व्यवसाय परवाना घेतलेला नाही. त्यामुळे ज्या कुंभार व्यवसायधारकांनी महानगरपालिकेचा व्यवसाय परवाना घेतलेला नाही त्यांनी आपला व्यवसाय परवाना तात्काळ परवाना विभागाकडून काढून घ्यावा. अन्यथा संबंधीतांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम ३७६ अ व ३१३ अन्वये महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल याची सर्व कुंभार व्यवसायधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या परवाना विभागामार्फत करण्यात आले आहे.