गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंध लसीकरण- शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणीची मोहीम
schedule04 Jul 25 person by visibility 47 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाळेमध्ये शिकणाऱ्या व शाळाबाह्य अशा दहा ते २६ वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोग (सर्व्हाईकल कॅन्सर) प्रतिबंधासाठी मागील शैक्षणिक वर्षात सुरु झालेली लसीकरणाची मोहीम गतीने राबवा. तसेच इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुला- मुलींच्या डोळे तपासणीची मोहीम हाती घ्या, यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई उपस्थित होते.
डोळ्यांच्या तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळणाऱ्या मुलांना कंपन्यांच्या सीएसआर निधी मधून मोफत चष्मे देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या म्हणजेच दहा ते २६ वयोगटातील शाळांतील व शाळाबाह्य मुलींना त्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेऊन गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठीचे लसीकरण करुन घ्या. यासाठी शिक्षण विभागाने पालकांच्या बैठकांचे नियोजन करावे तर आरोग्य विभागाने पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन त्यांच्या शंकांचे निराकरण करावे. तसेच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर स्तनाच्या कर्करोगासाठीची तपासणी शोध मोहीम हाती घ्या. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.